देखभाल संस्थांना वाचविण्याचे पालिकेचे प्रयत्न

पालिकेने बसविलेल्या रेटिंग यंत्राच्या साह्य़ाने नागरिकांनी अस्वच्छ ठरवलेले सार्वजनिक शौचालय स्वच्छ असल्याचे पटवून देत त्याची देखभाल करणाऱ्या संस्थेला वाचविण्याची धडपड पालिका अधिकाऱ्यांनीच सुरू केली आहे. पालिकेच्या विभाग कार्यालयांतील अधिकाऱ्यांनी हा घाट घातला असून वरिष्ठ अधिकारी मात्र त्याबाबत अनभिज्ञ आहेत.

सार्वजनिक शौचालये अस्वच्छ असल्याची तक्रार वारंवार नागरिक पालिकेकडे करीत आहेत. या तक्रारींची दखल घेऊन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सार्वजनिक शौचालयांत रेटिंग यंत्र बसविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबईतील सुमारे ५४ सार्वजनिक शौचालयांमध्ये रेटिंग यंत्र बसविण्यात आली.

या यंत्रावर ‘स्वच्छ’, ‘ठीक आहे’ आणि ‘अस्वच्छ’ अशी तीन बटणे बसविण्यात आली आहेत. शौचालयाची स्थिती काय आहे, हे या यंत्रांवरील तीनपैकी एका पर्यायाचे बटण दाबून नागरिकांनी पालिकेला कळवावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने नागरिकांना केले होते.

रेटिंग यंत्राचा अहवाल जाहीर झाला असून या अहवालातील अस्वच्छ शौचालयांच्या यादीमध्ये कांदिवली परिसरातील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील समतानगर पोलीस ठाण्याजवळील शौचालयाचा आघाडीवर क्रमांक लागला आहे. सर्वलोक सेवा समितीने २०१५ मध्ये या शौचालयाचे बांधकाम केले असून ते ‘पैसे द्या आणि वापरा’ या तत्त्वावर ते चालविण्यात येत आहे. या शौचालयाच्या बाबतीत तब्बल ६,६७,५३७ नागरिकांनी रेटिंग यंत्रावर मते नोंदवली.

त्यापैकी तब्बल ६,४९,९७३ लोकांनी हे शौचालय ‘अस्वच्छ’ असल्याचे मत नोंदविले आहे. तर ६,२८१ जणांनी ‘स्वच्छ’, तर ११,२८४ जणांनी ‘ठीक आहे’ असे मत नोंदविले आहे. ‘लोकसत्ता, मुंबई’ सहदैनिकामध्ये २८ एप्रिल २०१७ रोजी रेटिंग यंत्राच्या अहवालासंदर्भात ‘स्वच्छतागृहे स्वच्छ न राखणाऱ्या खासगी चालकांना तडाखा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या वृत्तामध्ये कांदिवली येथील शौचालय अस्वच्छतेत आघाडीवर असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. या संदर्भात पालिकेने मोठय़ा तत्परतेने हे शौचालय सुंदर स्वच्छ असल्याचा खुलासा ‘लोकसत्ता’ला पत्र पाठवून केला आहे.

सफाई कर्मचारी नम्र

रेटिंग यंत्राच्या अहवालात हे शौचालय आघाडीवर असल्याचा स्पष्टपणे उल्लेख आहे; मात्र पालिकेने केलेल्या खुलाशात हे शौचालय स्वच्छ असल्याचे म्हटले आहे. पालिकेच्या ‘आर-दक्षिण’ विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी हे शौचालय स्वच्छ असल्याचे पटवून देण्याचा खटाटोप सुरू केला आहे. या शौचालयाचे काम अतिशय नियोजनबद्ध असून शौचालय साफसफाई करणारा कर्मचारी वर्गही नम्र आहे व नियमित साफसफाई व सौंदर्यीकरण करण्यात येते, असे पालिकेने खुलाशात म्हटले आहे.