मुंबईत डेंग्यू, स्वाइन फ्लू, टायफॉइड अशा अनेक आजारांनी थैमान घातले असताना वडाळा येथील एका संक्रमण शिबिरातील रहिवाशांना गेले १२ दिवस अशुद्ध आणि मलाचा वास येणाऱ्या पाण्याचा पुरवठा होत आहेत. या विरोधात येथील रहिवाशांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या पुढाकाराने रविवार आणि सोमवार हे दोनही दिवस जोरदार आंदोलन केले. सोमवारी रहिवाशांनी शिवसैनिकांसह विकासकाच्या कार्यालयात प्रवेश करत घोषणाबाजी केली. शुद्ध पाणीपुरवठा आणि मलनि:सारण व्यवस्था होत नाही, तोपर्यंत या विकासकाचे इमारत बांधणीचे काम रोखून ठेवण्यात येईल, अशी भूमिका रहिवाशांनी घेतली.
वडाळा येथील भूखंड क्रमांक-१० येथे बैठय़ा चाळी आहेत. या चाळींमधील काही रहिवाशांनी आठ वर्षांपूर्वी रमेश सिंह या विकासकासह करार केला होता. या करारानुसार दोन वर्षांत या चाळींच्या जागी इमारत उभी करण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार काही चाळींतील रहिवासी आपल्या जागा सोडून विकासकाने दिलेल्या संक्रमण शिबिरातील जागांमध्ये राहायला गेले.