तीन वर्षांपूर्वी राजभवन येथे आढळलेल्या भव्य भूमिगत बंकरमध्ये साकारण्यात आलेल्या संग्रहालयाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते रविवारी सकाळी होणार आहे. राज्यपाल चे. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यासोबतच राजभवनातील इतर काही वास्तूंचेही भूमिपूजन आणि उद्घाटन केले जाणार आहे.

राजभवनातील हिरवळीखाली आढळलेले बंकर साधारण १५ हजार चौरस फुटांचे आहे.  या बंकरचे संवर्धन होणे आवश्यक होते. म्हणूनच त्याचे स्थापत्य परीक्षण करून या ठिकाणी आभासी वास्तवतादर्शक संग्रहालय उभारण्यात आले आहे. याद्वारे प्रेक्षकांना तोफा चालवण्याचा आभासी अनुभव घेता येईल. इतिहासातील बंकरच्या वापराबाबत तसेच राज्यातील गडकिल्ल्यांच्या आणि राजभवनच्या इतिहासाची माहिती देण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी ऑनलाइन आरक्षण केल्यास त्यांना या संग्रहालयाला भेट देता येईल.

या बंकरमध्ये विविध आकारांचे १३ कक्ष असून दर्शनी भागात २० फू ट उंच भव्य प्रवेशद्वार, किल्ल्याप्रमाणे बांधकाम तसेच तोफा आत नेण्यासाठी लांबलचक उतार आहे. तोफांच्या प्रतिकृती व जवानांच्या त्रिमितीय आकृत्याही येथे आहेत. बंकरचा शोध लागला त्या वेळी त्यातील कक्षांना ‘शेल स्टोअर’, ‘गन शेल’, काडतूस भांडार, शेल लिफ्ट, मध्यवर्ती तोफखाना कक्ष, कार्यशाळा इत्यादी नावे दिसून आली होती. शुद्ध हवा व नैसर्गिक प्रकाश येण्यासाठी तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था होती.

जल किरण, जल भूषण आणि जुळ्या तोफा

राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या २०० वर्षे जुन्या ‘जल भूषण’ या इमारतीच्या पुनर्बाधणीचे काम हाती घेतले जाणार असून त्यासाठी रविवारी भूमिपूजन होईल. १५० वर्षांचा इतिहास असलेल्या आणि राष्ट्रपती तसेच पंतप्रधानांसाठी आरक्षित असलेल्या ‘जल किरण’ या नूतनीकृत अतिथिगृहाचे उद्घाटन शनिवारी संध्याकाळी झाले. गेल्या वर्षी राजभवन येथे आढळलेल्या ब्रिटिशकालीन जुळ्या तोफांची औपचारिक प्रतिष्ठापना ‘जल विहार’ या ऐतिहासिक वास्तूसमोर करण्यात आली आहे. त्या ठिकाणी राष्ट्रपतींच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण होईल. या तोफांचे वजन प्रत्येकी २२ टन असून, लांबी ४.७ मीटर तर अधिकतम व्यास १.१५ मीटर इतका आहे.