News Flash

भूमिगत टाक्या पुढील वर्षी पूर्णत: कार्यरत

मुंबईतील किनारपट्टी मार्ग म्हणजेच कोस्टल रोडचे काम वेगाने पुढे सरकत असून ३६ टक्के काम झाले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत पालिका आयुक्तांकडून सादरीकरण

मुंबई : मुंबईतील किनारपट्टी मार्ग म्हणजेच कोस्टल रोडचे काम वेगाने पुढे सरकत असून ३६ टक्के काम झाले आहे. दरवर्षी हिंदमाता आणि गांधी मार्केट या सखल भागांमध्ये पाणी साचून होणाऱ्या त्रासावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येत आहे. या दोन्ही ठिकाणी पाणी साठवणाऱ्या भूमिगत स्वरूपाच्या मोठय़ा टाक्या बांधण्यात येत आहेत. सखल भागात पावसाचे पाणी भरू लागले तर ते या टाक्यांमध्ये सोडण्यात येईल. भरती ओसरल्यानंतर हे पाणी समुद्रात सोडण्यात येईल.

पावसाळ्यातही पातमुखे (आऊटफॉल), उपसा, खुले नाले या वाटे साचलेल्या पाण्याचा निचरा कशा पद्धतीने वेगाने केला जातो याविषयी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेकडून आढावा घेतला व सूचना दिल्या. पुराच्या पाण्याचा निचरा होऊन कोस्टल रोड कामातही बाधा येणार नाही तसेच नागरिकांनाही त्रास होणार नाही यासाठी यंत्रणा उभारली असल्याची माहिती यावेळी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सादरीकरणाद्वारे दिली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि पी. वेलरासू यांनी सादरीकरण केले.

प्रियदर्शिनी पार्क, चौपाटी, वरळी सी फेस अशा ठिकाणी एकंदर ७७ पातमुखे असून त्यातील ४३ हे समुद्रकिनाऱ्याला समांतर असे आहेत. सर्व पातमुखांची व्यवस्थित साफसफाई करण्यात आली आहे. अमरसन्स इंटरचेंज, हाजी अली इंटरचेंज, चौपाटी या ठिकाणी पुरेशा क्षमतेचे पंप बसविण्यात आले आहेत. किनारपट्टी रस्त्याला लागून १५ ठिकाणी असे ६३ पंप आहेत. पाण्याचा निचरा वेळोवेळी होऊन पाणी साचणार नाही तसेच कामातही बाधा येणार नाही अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

१०.५८ किमीच्या या सागरी मार्गाचे काम ३६ टक्के पूर्ण झाले असून या प्रकल्पावर एकूण १२ हजार ७२१ कोटी खर्च येणार आहे. प्रत्येकी तिहेरी मार्गाचे दोन मोठे बोगदे यात बांधण्यात येत आहेत. आतापर्यंत बोगदा खणण्याचे काम ९ टक्के, रिक्लेमेशन ९० टक्के, सागरी भिंत ६८ टक्के अशी कामाची प्रगती आहे. यावेळी विशेषत: हिंदमाता, गांधी मार्केट, चुनाभट्टी- कुर्ला, सायन रेल्वे स्थानक परिसर येथे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांची माहितीही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली. हिंदमाता परिसरातील साचणारे पाणी हे प्रमोद महाजन उद्यानातील भूमिगत टाक्यांमध्ये कसे साठविण्यात येईल याविषयीची चित्रफीतही दाखविण्यात आली.

पुढच्या वर्षीपासून या कामामुळे हिंदमाता परिसराला मोठा दिलासा मिळेल असेही सांगण्यात आले. यंदा परळ उड्डाणपूल आणि हिंदमाता उड्डाण पुलादरम्यान जोडरस्ता केला असून दोन्ही पुलांच्या मधील रस्त्याची उंची वाढविण्यात आली आहे, त्यामुळे गेल्या आठवडय़ात पाणी तुंबले तरी वाहतूक सुरळीत सुरू राहिली असेही पालिका आयुक्तांनी सांगितले.

मुंबईत ३८६ पुराचे पाणी साचण्याची ठिकाणे असून १७१ ठिकाणांवर पाणी साचणार नाही किंवा लगेच निचरा होईल यासाठी उपाययोजना केली असून जून अखेर इतर ठिकाणांची कामेही पूर्ण होतील, अशी माहिती चहल यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2021 12:26 am

Web Title: underground tanks fully operational next year akp 94
Next Stories
1 भाडेकरू कायद्याविरोधात विधानभवनावर ७ जुलैला मोर्चा
2 धारावीनं पुन्हा करून दाखवलं; सलग दुसऱ्या दिवशी शून्य रुग्णसंख्या!
3 Antilia Bomb Scare Case : मुंबईतून दोघांना अटक! NIA ची कारवाई!
Just Now!
X