प्रसाद रावकर

शहरात चार ठिकाणी महापालिकेचा प्रयोग

इंदूर, बंगळूरुच्या पावलावर पाऊल टाकत मुंबई कचराकुंडीमुक्त करण्याचा संकल्प पालिका प्रशासनाने सोडला असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत दोन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर भूमिगत कचराकुंडय़ा बसविण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी भूमिगत कचराकुंडय़ा उभारण्याचा पालिकेचा मानस आहे.

मुंबई स्वच्छ करण्यासाठी सफाई कामगार भल्या पहाटे घर सोडतात आणि नेमून दिलेल्या रस्त्यांची साफसफाई करतात. साधारण सकाळी आठ ते नऊपर्यंत मुंबईतील बहुतेक रस्ते स्वच्छ केले जातात आणि गोळा झालेला कचरा कचरावाहू गाडय़ा उचलून नेतात. अनेक वेळा कचरावाहू गाडी कचरा घेऊन गेल्यानंतर दिवसभर कचराकुंडीत कचरा पडून राहतो आणि कचराकुंडय़ा ओसंडून वाहू लागतात. अशा ठिकाणी भटके श्वान, घुशींचा मोठा वावर असतो.

मुंबई कचराकुंडीमुक्त करण्यासाठी पालिकेने अनेक प्रयत्न केले. सकाळी घंटागाडी घरोघरी फिरून कचरा गोळा करू लागली. परंतु काही भागात घंटागाडीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पालिकेने काही ठिकाणच्या कचराकुंडय़ा हटवल्या. मात्र रस्त्यावरच कचऱ्याचा ढीग साचू लागला. आता पालिकेने इंदूर आणि बंगळूरुच्या धर्तीवर मुंबईत दोन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर भूमिगत कचराकुंडय़ा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘ए’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील पारसी बावडीजवळील सीटीओसमोर आणि सत्र न्यायालयासमोर अशा दोन ठिकाणी भूमिगत कचराकुंडय़ा उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ‘डी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील वसंतराव नाईक मार्गावरील धोबीघाटासमोर किस्मत बिल्डिंगजवळ किंवा नाथा आखाडा, भगवान इंद्रजीत रोड, बाणगंगा स्मशानभूमीजवळ आणि एल. जगमोहनदास मार्ग, नेपीअन्सी रोड, नेपीअन्सी हाऊसजवळ भूमिगत कचराकुंडय़ा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

एका ठिकाणी १.१ घनमीटर क्षमतेच्या दोन अशा चार ठिकाणी आठ भूमिगत कचराकुंडय़ा उपलब्ध करण्यात येणार आहेत. एका कचराकुंडीत ५०० किलो कचरा साठविण्याची क्षमता आहे. मॅन एन्व्हेरटेक ही कंपनी या कचरकुंडय़ा बसविणार असून त्यासाठी ३७ लाख रुपये खर्च येणार आहे. येत्या आठ दिवसांत भूमिगत कचराकुंडय़ा उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार असून महिन्याभरात त्या कार्यान्वित होतील, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. या कचराकुंडय़ांमुळे पदपथावर कचरा दिसणार नाही, तो भूमिगत कचराकुंडीत असेल. कचरावाहू गाडी आल्यानंतर कळ दाबल्यावर कचराकुंडीच वर येईल आणि कचरा गाडीमध्ये भरला जाईल. त्यामुळे अस्वच्छता आणि दरुगधीतून सुटका होईल, असा आशावाद पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई स्वच्छ दिसावी, कचऱ्यामुळे दरुगधी अथवा आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ नयेत. म्हणून प्रायोगिक तत्त्वावर चार ठिकाणी भूमिगत कचराकुंडय़ा बसविण्यात येणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मुंबईत अन्य ठिकाणी भूमिगत कचराकुंडय़ा बसविण्याचा पालिकेचा मानस आहे.

– विश्वास शंकरवार, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन