News Flash

महापालिकेच्या आठ शिलेदारांमुळे कोल्हापूरकरांची तहान भागली

मुंबईतून गेलेल्या सफाई कामगारांनी स्वच्छता मोहिमेत सिंहाचा वाटा उचलला.

जलविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर पाण्याखाली गेलेले मुख्य पाणीपुरवठा केंद्र कार्यान्वित

प्रसाद रावकर, मुंबई

पूरस्थितीमुळे हाहाकार उडालेल्या कोल्हापूर, सांगलीकरांच्या मदतीला धाव घेत मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनी केवळ सफाई मोहिमेची धुरा खांद्यावर घेतली नाही तर पाण्याखाली गेलेले शिंगणापूरमधील मुख्य पाणीपुरवठा केंद्र कार्यान्वित करून बावडा, आपटेनगर, कावडा परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मोलाची मदत केली. मुंबई महापालिकेतील जल विभागामधील अवघ्या आठ शिलेदारांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी पाडली.

कोसळणारा मुसळधार पाऊस आणि धरणातून सोडण्यात न आलेले पाणी यामुळे कोल्हापूर, सांगली परिसरात हाहाकार उडाला. पहिल्या मजल्यापर्यंत पाण्याचे साम्राज्य पसरले होते. कोल्हापूर, सांगली परिसराला पाणीपुरवठा करणारी केंद्रेही पाण्याखाली गेली होती. कोल्हापूरमधील परिस्थिती भयानक होती. शिंगणापूरचे मुख्य पाणीपुरवठा केंद्र पाण्याखाली गेले होते. कोल्हापूर, सांगलीमध्ये साचलेले पाणी हळूहळू ओसरू लागले आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी पूरग्रस्त भागात मदतीसाठी अभियंते, अधिकारी, कर्मचाऱ्यांची कुमक पाठविली. ते स्वत: जातीने या भागात हजर होते. मुंबईतून गेलेल्या सफाई कामगारांनी स्वच्छता मोहिमेत सिंहाचा वाटा उचलला.

शिंगणापूर पाणीपुरवठा केंद्रात ५४० हॉर्स पॉवरचा एक आणि ४३५ हॉर्स वॉवरचे पाच पंप असून या केंद्रामधून कोल्हापूरमधील ७० ते ८० टक्के भागाला पाणीपुरवठा करण्यात येतो. या केंद्रात पहिल्या मजल्यावर पाणी होते. त्यामुळे पाणीपुरवठा करणारी सर्व यंत्रणा पुराच्या पाण्याखाली होती. मुंबई महापालिकेच्या अन्य विभागांसह जल विभागातील अभियंते, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे एक पथक १३ ऑगस्ट रोजी कोल्हापूरला रवाना झाले होते. सांगलीतील जॅकवेल पाणीपुरवठा केंद्र, हिराबाग पाणीपुरवठा केंद्रात सुरू असलेल्या कामाची पाहणी आणि थोडीफार मदत करीत असलेल्या या पथकाला प्रवीणसिंह परदेशी यांनी तातडीने शिंगणापूर पाणीपुरवठा केंद्रावर पोहोचण्याचे आदेश मिळाले. या पथकाने शिंगणापूर केंद्र गाठले. शिंगणापूर पाणीपुरवठा केंद्राला पडलेला पुराच्या पाण्याचा वेढा हळूहळू कमी होत होता. परिसरातील पाणी हळूहळू ओसरले. मात्र केंद्रात चिखलाचे साम्राज्य पसरले होते. वीजपुरवठा खंडित होता. पाणी उपसा करणाऱ्या पंपांची दुर्दशा झाली होती. विद्युतपुरवठा महामंडळाच्या मदतीने वीजपुरवठा सुरू करण्यात यश आले आणि त्यानंतर या पथकाने रात्रंदिवस अखंडपणे प्रतिकूल परिस्थितीत काम करून १९ ऑगस्ट रोजी शिंगणापूर पाणीपुरवठा केंद्रातील एक पंप कार्यान्वित केला. त्यानंतर २० ऑगस्ट रोजी पहाटेपर्यंत उर्वरित सहा पंप कार्यान्वित करण्यास या पथकाला यश आले. त्यामुळे कोल्हापूरमधील सुमारे ७० ते ८० टक्के भागातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला.

पूरग्रस्त कोल्हापूरकरांची तहान भागविण्यासाठी मुंबई महापालिकेच्या जल विभागातील कार्यकारी अभियंता राजेश ताम्हाणे, सहाय्यक अभियंता जीवन पाटील, यांत्रिकी शंकर कचरे, पंप चालक राजेश रॉड्रिग्ज, जीवराज सोसा, कामगार उल्हास शिरसेकर, वाहनचालक राजेश सुर्वे, राजेंद्र पेडणेकर या आठ शिलेदारांनी प्रतिकूल परिस्थितीवर

मात करीत अथक प्रयत्नानी शिंगणापूर पाणीपुरवठा केंद्र कार्यान्वित करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. याबद्दल कोल्हापूर पालिकेने सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन या आठ जणांचा गौरव केला. केवळ कोल्हापूरकरच नव्हे तर विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 2:16 am

Web Title: underwater water supply center due to flood repair by bmc staff zws 70
Next Stories
1 मराठीच्या अनिवार्यतेचा मसुदा विधि व न्याय विभागाकडे
2 कर्करोगाचे वेळेत निदान करणारी ‘ऑन्कोडिस्कव्हर’ चाचणी उपलब्ध
3 राज्यभरात पायाभूत सुविधांची वेगवान प्रगती
Just Now!
X