मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात शरद पवारांची चिंता

विदर्भात पक्षाचा पाया विस्तारण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी विदर्भातील बंद पडणारे उद्योग आणि वाढती बेरोजगारी याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. तरुणांमधील नाराजीचा नक्षलवाद्यांसारख्या वृत्ती याचा गैरफायदा घेऊ शकतील, अशी भीतीही व्यक्त केली आहे.

विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. २०१४च्या लोकसभा निवडणुकीपासून प्रत्येक निवडणुकीत विदर्भात भाजपला चांगले यश मिळाले. भाजपच्या या बालेकिल्ल्यातील वाढत्या बेरोजगारीकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात पवार यांनी, विदर्भातील उद्योगबंदीच्या प्रश्नात तातडीने लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

गेल्याच आठवडय़ात चार दिवस शरद पवार यांनी गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा या चार जिल्ह्य़ांचा दौरा केला होता. या दौऱ्यात आलेल्या अनुभवांच्या आधारेच पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ातील बल्लारपूर पेपर मिलला राज्य सरकारच्या वतीने बांबूंचा पुरवठा केला जात असे. पण २०१४ पासून हा पुरवठा बंद करण्यात आला. परिणामी आसाम आणि मध्य प्रदेशातून बांबू आणावा लागतो आणि त्याचा वाहतूक खर्च वाढतो. मध्यंतरी ही पेपरमिल बंद होती. आता पुन्हा सुरू झाली असली तरी सहा महिने कामगारांचे वेतन मिळालेले नाही. गडचिरोली जिल्ह्य़ातील पेपरमिल ही बल्लारपूर मिलवर अवलंबून होती.

गडचिरोलीची पेपरमिल बंद पडल्याने ६०० कामगार बेरोजगार झाले आहेत. विदर्भात बंद पडलेल्या विविध उद्योगांमुळे सुमारे २० हजार कामगार बेरोजगार झाले आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक आणि गंभीर आहे. विदर्भात नवीन उद्योग सुरू होण्यास चालना मिळणे आवश्यक असताना जुने उद्योग बंद पडत असल्यास ते चिंताजनक आहे. त्याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा पवार यांनी पत्रात व्यक्त केली आहे.