डॉ. अविनाश सुपे

* निवडणुकीतील मुख्य मुद्दे कोणते?

ग्रामीण भागात आरोग्याच्या पायाभूत सुविधांची कमतरता आणि सरकारचे आर्थिक धोरण हे या निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे आहेत असे वाटते. राज्यातील रस्ते सुधारण्यामध्ये सरकारला अजूनही म्हणावे तितकेयश आलेले नाही. ठिकठिकाणच्या पूरपरिस्थितीवर सरकारला योग्य पद्धतीने नियंत्रण आणता आले असते. पूरग्रस्तांसह शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. आरोग्यासाठी अर्थसंकल्पामध्ये केवळ १.५ टक्के तरतूद केलेली आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी ती किमान तीन ते पाच टक्क्यांपर्यत वाढणे आवश्यक आहे. सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्यमान’ भारत योजनेला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने प्रत्यक्ष जनतेला होणारा फायदा तुलनेने फारच कमी आहे. सरकारच्या काही निर्णयांमुळे आर्थिक मंदीची झळही सोसावी लागत आहे.

* या मुद्दय़ांना राजकीय पक्ष भिडतात असे वाटते का?

या मुद्दय़ावर राजकीय पक्ष मात्र मूग गिळून बसले आहेत. विशेषत: आरोग्य हा महत्त्वाचा विषय असूनही कोणत्याही पक्षाने त्याला प्राधान्य दिलेले नाही. अर्थसंकल्पात आरोग्यासाठी केलेली तुटपुंजी तरतूद, आरोग्य व्यवस्थेतील पायाभूत सुविधांचा अभाव यावर कोणत्याही पक्षाने आवाज उठविलेला नाही.

*तुम्ही उमेदवार असता तर प्राधान्य कशाला दिले असते?

सामान्य व्यक्तीवरील महिन्याच्या खर्चाचे ओझे कसे कमी होईल यासाठी उपाययोजना केल्या असत्या. वीज आणि पाणी देयकात कपात, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणेवर भर देण्यासाठी प्रवासभाडे आणि पेट्रोलचे दर कमी करण्यास प्राधान्य दिले असते. सामान्य व्यक्तीला अन्न स्वस्त आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले असते. ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या तर शहराकडे येणारा ओढाही कमी होऊ शकेल. त्यामुळे शहरासोबतच आणि ग्रामीण भागात सार्वजनिक शिक्षण आणि आरोग्य सुविधा सक्षम करण्यावर भर दिला असता.

* नवमतदारांना काय संदेश द्याल?

मतदान करण्यापूर्वी तुमच्या भागातील उमेदवाराचे कामकाज, शिक्षण, गुन्हेगारी पाश्र्वभूमी इत्यादी बाबी तपासून घ्या. आंधळेपणाने मतदान करू नका.

* प्रचारात कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात?

प्रचारात एकमेकांवर वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप करू नयेत. पैसे किंवा अन्य माध्यमांतून मते खरेदी करू नयेत. तसेच प्रचाराला हिंसक वळण लागेल, अशी कोणतीही कृती करू नये. प्रचारयात्रांमुळे रस्त्यांवर गर्दी किंवा वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये किंवा सर्वसामान्य व्यक्तींना त्रास होऊ, नये याची काळजी घ्यावी.

      (संलकन : शैलजा तिवले)