शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अंगरक्षक, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष ते शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबईतील खासदार असा प्रवास केलेले मोहन रावले यांनी शुक्रवारी थेट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली. एवढेच नव्हे तर बाळासाहेबांच्या काळातील शिवसेना आता राहिली नाही, अशी मल्लिनाथीही केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असलेल्या रावले यांनी शुक्रवारी कृष्णभवन येथे जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. यापूर्वी शिवसेना नेते मनोहर जोशी यांनीही अशाच प्रकारे सेना नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र रावले यांनी थेट राज यांची भेट घेत शिवसेना नेतृत्वावर टीकेची तोफ डागली.
मोहन रावले यांनी आपली राजभेट वैयक्तिक असल्याचे सांगतानाच पूर्वी शिवसेनेत दक्षिण मुंबई लोकसभेसाठी उमेदवाराचा विषय आला की बाळासाहेब ठाकरे मला बोलावून चर्चा करायचे. मात्र आता अशी कोणतीही चर्चा करण्यात येत नाही. तसेच तेथील शिवसेनेच्या कोणत्याही फलकांवर अथवा कार्यक्रमांमध्ये माझे नावही घेतले जात नाही, अशी व्यथा रावले यांनी व्यक्त केली.
राज यांच्याबरोबर काही राजकीय चर्चाही झाली असून त्यांना भेटलो यासाठी जर माझ्यावर कारवाई होणार असेल तर यापूर्वी शिवसेनेचे अनेक नेते वेळोवेळी शरद पवार यांची जी भेट घेतात ते कसे चालते, असा सवालही रावले यांनी केला. विधिमंडळाच्या अधिवेशनात सेनेचे नेते कोणाकोणाला भेटतात याचीही सर्वाना कल्पना आहे, असेही ते म्हणाले.