शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेतील नाराजांचा ओघ राष्ट्रवादी किंवा मनसेमध्ये वळेल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच नाशिकमधील नाराज शिवसेना नेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये आज प्रवेश केला. शिवसेनेत फोडाफोडी करणार नाही, पण कोणत्याही पक्षातील ताकद असलेल्या नाराजांना राष्ट्रवादीची दारे खुली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचित केले.
नाशिक शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल, शहरप्रमुख अर्जुन टिळे आणि माहिला आघाडीच्या प्रमुख शोभाताई मगर यांच्यासह अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड आणि नाशिकचे खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.  गेली ३३ वर्षे शिवसेनेत आपण काम केले, पण गेल्या वर्षभरात उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधणे कठीण झाले. त्यातूनच वाद निर्माण झाल्याचे बागूल यांनी याप्रसंगी सांगितले. यापूर्वी नाशिक जिल्ह्य़ाने शरद पवार यांना पूर्ण साथ दिली होती. जिल्ह्य़ातील सर्व आमदार पवार यांच्या विचारांचे निवडून आले होते. तसेच पुढील निवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळवून देण्याचा निर्धार अर्जुन टिळे यांनी व्यक्त केला.
शिवसेनेतील नाराजांना राष्ट्रवादीत दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली का, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, शिवसेनाच नव्हे तर सर्व पक्षांमध्ये नाराज आहेत. ही नाराज  मंडळी अन्य कोणत्या तरी पक्षांमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. चांगली ताकद असलेल्या नाराजांना राष्ट्रवादीत स्थान दिले जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीमधील नाराजीबाबत विचारले असता त्यांनी पक्षात काही जण जरूर नाराज असू शकतात. काम करणाऱ्यांना पक्षात संधी दिले जाते, असे सांगत नाराजांना सूचक इशारा दिला. शिवनसेनेचे काही खासदार-आमदार संपर्कात असल्याच्या बातम्या येत असल्या तरी त्यात काही तथ्य नाही, पण भविष्यात काहीही होऊ शकते, असे उद्गार त्यांनी काढले.
मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव हे राष्ट्रवादीच्या संपर्कात नाहीत. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याचे समजताच त्यांना दूरध्वनी करून राजीनामा देऊ नये अशी सूचना त्यांनी केली. कन्नडमध्ये मोठा दुष्काळ आहे. अशा परिस्थितीत आमदारकी सोडल्यास लोकांमध्ये नाराजी पसरली असती. यामुळेच टोकाचे पाऊल उचलू नये, अशी विनंती आपण त्यांना केली होती, असे पवार म्हणाले.

raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
NCP, sanjay Raut, sangli,
सांगलीत संजय राऊत यांच्या मदतीला राष्ट्रवादी का धावून गेली ?
actor govinda congress
‘राजकारणात येऊन मोठी चूक केली’, काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर गोविंदानं असं का म्हटलं होतं?
war Of words between amol kolhe and shivajirao adhalrao patil over shirur lok sabha constituency
शिवाजीराव आढळरावांच्या ‘राष्ट्रवादी’तील प्रवेशानंतर ‘शिरूर’मध्ये आता शब्दिक युद्ध