मुंबई व उपनगरांच्या रेल्वेमार्गाला खेटून असलेल्या मोकळ्या जमिनीवर घेण्यात येणारे भाज्यांचे पीक हे मध्य रेल्वेच्या उत्पन्नाचे मोठे साधन असल्याचे स्पष्ट झाले आहे. ४०० एकरहून अधिक जमिनीवर रेल्वेचे अडीचशे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय किंवा नातेवाईक राबून भाज्यांचे पीक घेतात. हा भाजीपाला वर्गीकृत करून विक्रीसाठी  पाठवला जातो. या उलाढालीतून रेल्वेच्या तिजोरीत दरवर्षी १५ ते २० लाखांच्या उत्पन्नाची भर पडत असते. हा भाजीपाला मुंबईकरांच्या आरोग्यास घातक असल्याचे विविध चाचण्यांमधून स्पष्ट झाले असले तरी रेल्वेच्या लेखी हा भाजीपाला खाण्यायोग्य आहे!
मध्य रेल्वेवरील परळ, मुलुंड, कळवा व ठाकुर्ली या स्थानक परिसरांत मोठय़ा प्रमाणात असलेल्या मोकळ्या जागा रेल्वेच्या मालकीच्या आहेत. या मोकळ्या जागांमध्ये होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी आणि तेथील आजूबाजूच्या जमिनींची राखण करण्यासाठी रेल्वेतर्फे अधिकृतपणे या भाजीपाला लागवडीस परवनागी दिली जाते. मात्र, या भागातील भाजीपाला लागवडीला पाण्याचा कोणताही स्त्रोत रेल्वेकडून उपलब्ध करून दिला जात नाही. चवळी, भेंडी, पालक, मुळा, लाल चवळी, अंबाडी, लाल माठ, कोबी आणि फ्लॉवर या सारख्या भाज्यांची लागवड यामध्ये केली जाते. ४०० एकरहून अधिक जमिनीवर रेल्वेचे अडीचशेहून अधिक कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय किंवा नातेवाईक शेती करत आहेत. त्यांच्याकडून एकरी चार हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न रेल्वेस मिळते, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना रेल्वेकडून भाजीपाल्यासाठी मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी अनेक ठिकाणी अशा कर्मचाऱ्यांपेक्षा अन्यच कामगार ही शेती पिकवत असल्याचे चित्र रेल्वे परिसरात दिसून येते.

उत्पादन व वितरण

रेल्वे रूळावर उत्पादित केलेल्या भाजीपाल्याचे वर्गीकरण करून त्याची बाजारपेठ ठरवली जाते. चांगला दिसणारा भाजीपाल मुंबईतील रेल्वे स्थानकांबाहेरील भाजी विक्रेत्यांकडे पोहचवला जातो. तर उर्वरित स्थानिक बाजारात विकला जातो. तर कमी दर्जाचा भाजीपाला काही महिला विक्रेत्या शहरातील गल्लीबोळांमध्ये टोपली आणि बोचक्यातून विकतात.

रेल्वेमार्गालगतच्या मोकळ्या जागांवर अतिक्रमण आणि घाणीचे साम्राज्य होऊ नये यासाठी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना ही जागा भाडे तत्वावर दिली जाते. गँगमन आणि रुळांची देखभाल दुरूस्ती करणारे रेल्वेचे कर्मचारी या जागांवर भाजीपाला तसेच फुलझाडे लावत असतात. रेल्वेचा वैद्यकीय विभाग या भाजीपाल्याच्या गुणवत्तेची दर सहा महिन्याने तपासणी करतो. या भाजीपाल्यात दुष्परिणाम करणारे घटक आढळल्यास त्यावर कारवाई केली जाते.
– नरेंद्र पाटील, रेल्वे जनसंपर्क अधिकारी