अर्थसंकल्प जाणून घ्या सहजपणे

करांचा गुंता, तुटीचे गणित, नेमके स्वस्त-महाग म्हणजे काय, आर्थिक तरतूद पुरेशी अथवा तिचा होणारा परिणाम हे सारे उलगडून दाखविण्यासाठी ‘लोकसत्ता’चा गुरुवार, २ फेब्रुवारीचा अंक विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसह सज्ज असेल. २०१७-१८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे सहज-सुलभ विश्लेषण  आर्थिक विश्लेषक तसेच विविध क्षेत्रातील अभ्यासक आपल्या लेखणीतून अंकात करतील. त्यामुळे यंदाही ‘लोकसत्ता’सोबत वाचकांना अर्थसंकल्प सहजपणे जाणून घेता येईल.

अर्थसंकल्पामागील नेमका अर्थ वार्षिकीप्रमाणे ‘लोकसत्ता’ त्यातील वैशिष्टय़े, आकडेवारी, परिणामकता याद्वारे वाचकांसाठी उलगडून दाखविणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था आणि अर्थसंकल्प यांची सांगड घालताना आदित्य बिर्ला समूहाचे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे, एल अ‍ॅण्ड टी फायनान्स होल्डिंग्जच्या मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. रूपा रेगे-नित्सुरे, एल अ‍ॅण्ड टी फायनान्स होल्डिंग्जचे अध्यक्ष वाय. एम. देवस्थळी व केअर रेटिंग्जचे मुख्याधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश मोकाशी आदी नेमक्या शब्दात अर्थसंकल्पाचा अन्वयार्थ उलगडतील.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या राजकीय नजरेतून टिपले जाणाऱ्या अर्थसंकल्पाचे यश-अपयश या अंकातून मांडले जाईल. कृषी क्षेत्राच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प कसा आहे हे खासदार राजू शेट्टी सांगतील. अर्थसंकल्पात आरोग्यनिगा क्षेत्रावर कितपत भर दिला हे आकडेवारीतून यान्सेन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव नवांगुळ स्पष्ट करतील. भांडवली बाजार, म्युच्युअल फंड तसेच वित्त क्षेत्रावर या अर्थसंकल्पाचा नव्या आर्थिक वर्षांत काय परिणाम होईल, हे एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे मुख्याधिकारी व व्यवस्थापकीय संचालक मिलिंद बर्वे तसेच प्रभूदास लीलाधरचे मुख्याधिकारी अजय बोडके नमूद करतील. अर्थसंकल्पात महिला व सामाजिक क्षेत्राची दखल कितपत घेतली गेली हे जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा किरण मोघे  स्पष्ट करतील. अर्थसंकल्पातील करांचे जाळे भेदण्याचा प्रयत्न व्यय लेखापाल आशीष थत्ते हे आपल्या निरीक्षणात्मक लेखनाद्वारे करतील.

संसदेत बुधवारी सकाळी ११ वाजता सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या वेळीच ‘लोकसत्ता’चे निवडक तज्ज्ञ निमंत्रित चर्चा करणार असून त्याचेही सचित्र वर्णन गुरुवारच्या  ‘अर्थसंकल्पीय’ अंकातून केले जाणार आहे. आर्थिक विश्लेषक नीरज हातेकर, सनदी लेखाकार प्रवीण देशपांडे, भांडवली बाजाराचे जाणकार अजय वाळिंबे व ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर हे यावेळी सहभागी होतील.