|| संदीप आचार्य

सुभाष साळुंखे यांचे प्रत्युत्तर; इतर राज्यांतही करोनाचा धोका

मुंबई : केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेला व सरकारच्या करोना नियंत्रण कामावर टीका करण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात करोना वाढला म्हणून आज काही लोक टाळ्या वाजवत आहेत; पण एप्रिलनंतर राज्यातील करोना कमी होईल आणि पश्चिम बंगालसह निवडणुका असलेली पाच राज्ये तसेच उत्तर प्रदेशमध्ये करोना वाढेल तेव्हा आज महाराष्ट्रावर टीका करणारी मंडळी काय करतील, असा सवाल राज्याचे माजी आरोग्य महासंचालक व राज्याचे प्रमुख करोना सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी केला.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना मी १९९५ पासून ओळखतो, असे सांगून डॉ. साळुंखे म्हणाले, तेव्हा पोलिओ निर्मूलनासाठी त्यांनी चांगले काम केले होते.  त्यांना देशातील आरोग्यव्यवस्थेची पूर्ण जाण असतानाही त्यांनी जी महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेवर टीका केली ती दुर्दैवी असून राजकीय हेतूने केली आहे, हे मी जबाबदारीने सांगतो.

 राज्याचे लक्षणीय काम

महाराष्ट्र, तमिळनाडू व केरळ या राज्यांतील आरोग्य सेवा देशात सर्वोत्तम आहे. महाराष्ट्रातील वाढता करोना रोखण्यासाठी ज्या पारदर्शीपणे राज्य सरकार काम करत आहे तसे अन्यत्र कोठेही होत नाही.  उत्तर प्रदेशसह कोणत्याही राज्यातील वस्तुस्थिती तपासण्यासाठी केंद्राकडे कोणती यंत्रणा आहे, असा सवाल करून डॉ. साळुंखे म्हणाले,  राज्ये जी आकडेवारी देतात तोच आधार घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालय विश्लेषण करत असते. कुंभमेळा संपल्यानंतर तेथे करोना वाढेल हे लक्षात घेऊन पाच राज्ये व कुंभमेळ्याच्या ठिकाणी काय उपाययोजना करायच्या यावर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रात रोज ५० हजारांपेक्षा अधिक करोना रुग्ण सापडत असल्यानेच  २५ वर्षांवरील तरुणांना लस मिळणे गरजेचे आहे. महाराष्ट्राने ही जी भूमिका मांडली ती  योग्य असून  पुरेसा लसपुरवठा करणे ही केंद्र सरकारचीच जबाबदारी आहे. महाराष्ट्र सरकार लसीची मागणी ही केंद्राकडे करणार नाही तर काय अमेरिकेकडे करणार का, असा सवालही डॉ. साळुंखे यांनी केला.