‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमात केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे उद्गार

चौथी औद्योगिक क्रांती येऊ घातली असून ही डिजिटल क्रांती आहे. तरुणांनी आरोग्यसेवा, पर्यावरण आणि पर्यटन-आदरातिथ्य क्षेत्रांचा एकत्रित विचार करून काम केल्यास या क्रांतीत उद्याचा काळ भारताचाच असेल, असा ठाम विश्वास केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी व्यक्त केला. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या उपक्रमात भविष्याला आकार देण्यासाठी वर्तमानात स्वत:ला झोकून दिलेल्या १२ तरुण-तरुणींचा गौरव करताना ते बोलत होते.

विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाची नाममुद्रा उमटविणाऱ्या या बारा जणांमध्ये सौरभ पाटणकर (विज्ञान), अम्रिता हाजरा (विज्ञान), जव्वाद पटेल (विज्ञान), कविता राऊत (क्रीडा), ललिता बाबर (क्रीडा), वैशाली शडांगुळे (उद्योग-व्यवसाय), शंतनू पाठक (उद्योग-व्यवसाय), यजुर्वेद्र महाजन (सामाजिक), सागर रेड्डी (सामाजिक), निपुण धर्माधिकारी (कला-मनोरंजन), राहुल भंडारे (कला-मनोरंजन) आणि मुक्ता बर्वे (कला-मनोरंजन) यांचा समावेश होता. प्रभू यांच्यासह ज्येष्ठ उद्योगपती बाबा कल्याणी यांनीही या तेजांकितांना गौरविले.

यावेळी प्रभू म्हणाले की, जग सतत बदलत असते. आपण बदल थांबवू शकत नाही. मात्र जे बदल होत आहेत त्यानुसार आपल्यात बदल करून त्यांचा लाभ घेऊ शकतो. उद्याचे जग नव्या चौथ्या डिजिटल औद्योगिक क्रांतीला घेऊन येत आहे. ही  डिजिटल क्रांती आहे. इंटरनेटचा वाढता प्रसार, मोबाइलसारख्या उपकरणांचा वाढता वापर यातून या क्रांतीला मोठी चालना मिळणार आहे. त्यातून ई-कॉमर्सही मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. हे सर्व लक्षात घेऊन तरुणांनी पुढील पावले उचलावीत. येत्या सात-आठ वर्षांत भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट होईल त्यातून कोटय़वधी तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी मिळतील. आपल्याला आफ्रिकेसारखी मोठी बाजारपेठही गवसेल, असे प्रभू यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ उद्योगपती बाबा कल्याणी म्हणाले की, तरुणांनी आपल्या व्यवसायात प्रगती करतानाच देशालाही कसे पुढे आणता येईल, याचा विचार करावा. चारशे वर्षांंपूर्वी भारत जसा समृद्ध आणि संपन्न होता तसा देश घडवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे.

चाळीस वर्षांच्या आतील तरुणांकडून ‘लोकसत्ता’ने स्वनामांकन पत्र मागविले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून पाचशे स्वनामांकन पत्रे ‘लोकसत्ता’कडे आली त्यातून बारा जणांची अंतिम निवड करण्यात आली. ही निवड करण्याचे काम ‘प्राइसवॉटरहाऊस कूपर्स’ या आंतरराष्ट्रीय विश्लेषण संस्थेच्या साहाय्याने विविध क्षेत्रांतील एका निष्पक्ष तज्ज्ञ समितीने केले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, एलआयसी फायनान्स होल्डिंगचे माजी अध्यक्ष वाय. एम. देवस्थळी, स्नेहालय या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर आणि ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा या निवड समितीत सहभाग होता. या तज्ज्ञांचा द इंडियन एक्स्प्रेस प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी संचालक अनंत गोयंका यांच्या हस्ते या वेळी सत्कार करण्यात आला. तरुण तेजांकितांचा सत्कार करताना मंचावर मिराडोरचे विजय पवार, सारस्वत बँकेचे गौतम ठाकूर, केसरी टूर्सचे केसरी पाटील आणि इंडियन एक्स्प्रेस समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज वर्गीस उपस्थित होते. विजेत्यांना सन्मानचिन्हे आणि सन्मानपत्रे देण्यात आली.

महत्वाकांक्षा, धाडस, हिंमत या गोष्टी कोणी शिकवून येत नाहीत. त्या आतूनच याव्या लागतात. त्यातूनच नवीन काही निर्माण करू पाहणारे घडत असतात, हे तरुणांनी लक्षात घ्यावे. भारताला जगात आघाडीचा देश बनवण्यासाठी खूप मोठी वाटचाल करायची आहे आणि त्याची जबाबदारी तरुणांवर आहे.

      – बाबा कल्याणी, उद्योजक