अवकाळी पावसामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पीकं या पावसामुळे वाहून गेली आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणे अवघड बनले आहे. यासाठी राज्यातील अनेक नेत्यांनी केंद्र सरकारकडे मदत करण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर उद्या (गुरुवार) केंद्रीय पथक अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर येणार आहे.

हे पाच सदस्यीय केंद्रीय पथक २२, २३ आणि २४ नोव्हेंबर या तीन दिवसांच्या काळात राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहे. या काळात नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभांगातील परिस्थितीचा आढावा ते घेतील. डॉ. व्ही. तिरुपुगल या केंद्रीय पथकाचे नेतृत्व करणार आहेत. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३५२ तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असून ९४ लाख हेक्टरवरील शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. याचा फटका १ कोटी ३ लाख शेतकऱ्यांना बसला आहे. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका औरंगाबाद विभागाला बसला असून त्यानंतर अमरावती आणि नाशिक विभागातील जिल्ह्यांना याची झळ सोसावी लागली आहे. विदर्भातील कापूस आणि सोयाबिन पिकाचे यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

दरम्यान, राज्य सरकारने केंद्र सरकारकडे यापूर्वीच ७,२०७.७९ कोटी रुपयांची मदत मागितली होती. मात्र, राज्यात सरकारच अस्तित्वात नसल्याने राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन केंद्रामार्फत मदत मिळवून देण्याची विनंती केली होती. त्यानंतर राज्यपालांनी बागायती शेतीसाठी १८ हजार रुपयांची तातडीची मदत देण्याचे आदेश दिले होते. मात्र, ही मदत अपूरी असल्याने आता उद्या राज्याच्या दौऱ्यावर असलेले पथक काय निर्णय घेईल याकडे बळीराजाचे लक्ष लागून राहिले आहे.