दीशा खातू

मर्यादित जागेचा कलात्मक वापर करून देखावे

सार्वजनिक गणेशोत्सवात अनेक कलावंत आपल्या सर्जनशीलतेचे दर्शन घडवत कल्पक देखावे, चलचित्र साकारून सामाजिक संदेश देत असतात. देखाव्यांच्या सजावटीची हीच सर्जनशीलता अनेक घरगुती गणपतींभोवतीही पाहायला मिळते. मुंबईतील अनेक हस्तकलाकार आपल्या घरातली गणपतीच्या देखाव्यांमध्ये अनेक नावीन्यपूर्ण, कल्पक आणि सामाजिक आशय असणारे प्रयोगशील देखावे साकारत आहेत.

सांताक्रुझला राहणारे हस्तकलाकार सचिन पवार गेल्या २५ वर्षांपासून त्यांच्या घरातील गणपतीची वैविध्यपूर्ण सजावट करत आहेत. आतापर्यंत त्यांनी विविध देखावे उभारले आहेत. त्यात हत्तीची अंबारी, मुशक सभा, रथ, पालखी इत्यादीचा समावेश होता. यंदा त्यांनी अवघ्या १२ दिवसांत मराठी ‘बिग बॉस’च्या सेटवरील आकर्षक प्रवेशद्वार उभारले आहे. त्यांना या कामात त्यांच्या मुलीनेही मदत केली.

शाळेत शिक्षक असणारे प्रमोद महाडिक यांच्या घरी ४६ वर्षांपासून दरवर्षी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली जात आहे. ते नेहमीच टाकाऊपासून टिकावू अशी पर्यावरणस्नेही सजावट करण्यावर भर देतात. आतापर्यंत त्यांनी ‘मातृ-पितृ ऋण’, ‘बिबटय़ा का चिडला ?’, ‘सोशल मिडीयाचे परिणाम, ‘२६ जुलैचा प्रलय’, ‘प्लास्टिकच्या अतिवापर’ इत्यादींवर देखावे उभारले आहेत. या वर्षी त्यांनी ‘आठवणींची शाळा’ या विषयावर पुठ्ठा आणि कार्डबोर्डचा वापर करून चलचित्र बनवलेले आहे. त्यासाठी त्यांना १० दिवस लागले.

शार्दुल म्हाडगूत यांच्या परळच्या १० बाय १६ चौरस फुटांच्या घरात गेल्या ६७ वर्षांपासून गणपती विराजमान होत आहे. पूर्वी त्यांचे आजोबा देखाव्यासाठी कापडावर जंगल आणि जंगलातले प्राण्यांचे चित्र रंगवत तर कधी आरशांचा कलात्मक वापर करत. मग पुढे हळू हळू त्यात बदल झाले कधी ‘तुळशी वृंदावन’, ‘ससा कासवाची गोष्ट’, भारताच्या ५० व्या स्वातंत्र्य दिनाच्या वर्षांनिमित्त भारताचा नकाशा, वडाचे झाड इत्यादी देखावे उभारण्यात आले. यंदा गुरुकुल परंपरेचे चित्रण करण्यात आले. हा देखावा कागदी लगदा, हिट लॉन (स्पंजचा प्रकार), गवत, लाकूड इत्यादींचा वापर करून बनवण्यात आला आहे