अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सुट्टय़ांमध्ये कपात; विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना

देशभरातील विद्यापीठांतील प्रथम वर्षांचे नवे शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीने घेतला आहे. राज्यातील विद्यापीठांना १८ नोव्हेंबरपासून नवे वर्ष सुरू करण्याची मुभा मिळणार आहे. सत्राअखेर एका आठवडय़ाचीच सुट्टी मिळणार आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे उच्चशिक्षण संस्थांचे हे शैक्षणिक वर्ष अद्यापही सुरळीत झालेले नाही. द्वितीय, तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांचे पुढील सत्राचे ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. प्रथम वर्षांचेही ऑनलाइन वर्ग राज्यातील विद्यापीठांत सुरू झाले आहेत. मात्र, अद्यापही केंद्रीय शिक्षण मंडळाच्या श्रेणीसुधार परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. त्याचप्रमाणे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा खोळंबल्यामुळे त्याचेही प्रवेश झालेले नाहीत. अंतिम वर्षांच्या पदवीच्या परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमांचीही प्रवेश प्रक्रिया झालेली नाही. या पार्श्वभूमीवर अद्यापही सुरू न झालेल्या सर्व अभ्यासक्रमांचे नवे शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबरपासून सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र, प्रवेश प्रक्रिया किंवा निकालाचे काम पूर्ण झाले नसल्यास वर्ष सुरू करण्यासाठी १८ नोव्हेंबपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील विद्यापीठांचे वर्ष १८ नोव्हेंबरपासून सुरू होणे अपेक्षित आहे.

सुट्टय़ांना कात्री

पहिल्या सत्राच्या परीक्षा संपल्या की दरवर्षी साधारण २० ते २५ दिवसांची सुट्टी मिळते तर वर्षांअखेरीस जवळपास महिन्याभराची सुट्टी मिळते. परीक्षा सुरू होण्यापूर्वीही १५ ते २० दिवसांची सुट्टी विद्यार्थ्यांना मिळते. यंदा मात्र या सुट्टय़ांमध्ये कपात होणार आहे. जून-जुलैमध्ये सुरू होणारे शैक्षणिक वर्ष अद्यापही सुरू न झाल्यामुळे बुडालेला कालावधी सुट्टय़ा कमी करून भरून काढण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. दोन्ही सत्रांच्या परीक्षेपूर्वी साधारण आठवडय़ाची आणि परीक्षेनंतर दुसरे सत्र किंवा नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी साधारण आठवडय़ाची सुट्टी देण्यात येईल.

प्रवेश रद्द झाल्यास शुल्क परत मिळणार

सध्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया खोळंबल्यामुळे विद्यार्थ्यांनी पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतले आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर घेतलेले प्रवेश रद्द करून दुसरीकडे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आता भरलेल्या शुल्काचे काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. नोव्हेंबर अखेपर्यंत प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कात कोणत्याही प्रकारची कपात न करता संपूर्ण शुल्क परत करण्यात यावे. त्यानंतर डिसेंबरअखेपर्यंत एक हजार रुपयांपर्यंत प्रक्रिया शुल्क कमी करून बाकी सर्व शुल्क परत करण्यात यावे असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

शैक्षणिक वर्ष कसे असेल?

-नव्या शैक्षणिक वर्षांची सुरूवात १ किंवा १८ नोव्हेंबरपासून

-प्रवेश प्रक्रिया किंवा निकालाचे काम रखडले असल्यास वर्ष सुरू करण्यासाठी १८ नोव्हेंबपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.

-पहिल्या सत्र परीक्षेपूर्वी १ ते ७ मार्च २०२१ सुट्टी देण्यात येईल

-८ ते २६ मार्च २०२१ दरम्यान पहिल्या सत्र परीक्षा होतील.

-२७ मार्च ते ४ एप्रिल २०२१ या कालावधीत पहिल्या सत्राअखेरची सुट्टी देण्यात येईल.

-५ एप्रिल २०२१ पासून दुसरे सत्र सुरू होईल

-दुसऱ्या सत्र परीक्षेपूर्वी १ ते ८ ऑगस्ट २०२१ या कालावधीत सुट्टी देण्यात येईल.

-९ ते २१ ऑगस्ट २०२१ दरम्यान दुसऱ्या सत्राच्या परीक्षा होतील.

-२२ ते २९ ऑगस्ट २०२१ वार्षिक किंवा दुसऱ्या सत्राअखेरची सुट्टी देण्यात येईल.

-या तुकडीचे पुढील शैक्षणिक वर्ष ३० ऑगस्ट २०२१ पासून सुरू होईल.

सीईटी आणि निकाल ऑक्टोबरमध्ये जाहीर करण्याचे आव्हान

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र यांसह विविध अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरावरील प्रवेश परीक्षा (सीईटी) १ ते २० ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. बारावीनंतरच्या विधि अभ्यासक्रमाची आणि हॉटेल मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा १० ऑॅक्टोबर रोजी तर शिक्षणशास्त्र आणि इतर व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यानंतर अवघ्या दहा ते पंधरा दिवसांत निकाल जाहीर करणे आणि पुढील प्रवेश प्रक्रिया राज्याच्या प्रवेश नियमन प्राधिकरणाला पूर्ण करावी लागेल.

नव्या शैक्षणिक वर्षांचे सुधारित वेळापत्रक तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालास आयोगाने मान्यता दिली. त्यानुसार देशातील विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, महाराष्ट्राला परीक्षा आणि निकालाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  त्यामुळे राज्याला १८ नोव्हेंबरपासून नवे वर्ष सुरू करता येईल.

– डॉ. भूषण पटवर्धन, उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग