राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांचे संकेतस्थळे मराठीत करण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे केली होती. उच्चशिक्षण विभागाच्या संचालकांनी या मागणीला विरोध दर्शवित चक्क संकेतस्थळाचे मराठीकरण करणे जिकिरीचे ठरेल, असे कारण दिले. या प्रकरणी सातत्याने ही मागणी करणाऱ्या प्रहार विद्यार्थी संघटनेने आक्रमक पवित्रा धारण करत राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
राज्यात अभिमत विद्यापीठांसह २० विद्यापीठे असून या विद्यापीठांशी हजारो महाविद्यालये संलग्न आहेत. या महाविद्यालयांची संकेतस्थळे इंग्रजीबरोबरच मराठीतही असायला हवी, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रहार विद्यार्थी संघटनेने केली होती. महाराष्ट्र  सरकार सामान्य प्रशासनाच्या १९८६च्या मराठीत कामकाजाबाबतच्या सरकार निर्णयाचा आधार घेत ही मागणी केली होती. या मागणीसाठी टोपे यांनी उच्चशिक्षण संचालकांकडून एक अहवाल मागविला होता.
 हा अहवाल संचालकांनी नुकताच सादर केला असून राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालये यांच्या संकेतस्थळांचे मराठीकरण हे जिकिरीचे होईल, असे नमूद केले आहे.

राज्यात हजारो मराठी विद्यार्थी शिकत असताना मराठी भाषेला दिली जाणारी दुय्यम वागणूक प्रहार विद्यार्थी संघटना सहन करणार नाही. उच्चशिक्षण संचालकांनी तात्काळ सादर केलेला अहवाल दुरुस्त करून अहवाल सादर न केल्यास संघटनेतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
अ‍ॅड. मनोज टेकाडे, अध्यक्ष, प्रहार विद्यार्थी संघटना