विद्यापीठ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनांनी सुरू केलेले आंदोलन तात्पुरते स्थगित केले असून शासनाने मागण्या मान्य न केल्यास पुन्हा १९ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठ सेवक संयुक्त कृती समितीने काम बंद आंदोलन सुरू केले. बहुतेक विद्यापीठांनी त्यामुळे गुरूवारपासून सुरू होणाऱ्या परीक्षाही पुढे ढकलल्या. संघटनांचे प्रतिनिधी आणि शासनात गुरूवारी झालेल्या चर्चेनंतर संघटनेने त्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र, १७ ऑक्टोबपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १९ ऑक्टोबरपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

‘उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना करोनाची लागण झाली आहे. ते उपचार घेत आहेत. उच्च शिक्षण विभागातील अनेक अधिकाऱ्यांनाही करोनाची लागण झाली आहे. उच्चशिक्षण मंत्र्यांनी काही मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे,’ असे संघटनेने त्यांच्या पत्रकात नमूद केले आहे. सातवा वेतन आयोग लागू करावा, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ कार्योत्तर मान्यता घेऊन पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावे, अशा काही मागण्या संघटनेने केल्या होत्या.

परीक्षांबाबत संभ्रम कायम

मुंबई विद्यापीठ वगळता राज्यातील बाकी बहुतेक विद्यापीठांनी आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर अंतिम वर्षांच्या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १२ ऑक्टोबरपासून परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. मागण्या मान्य न झाल्यास १९ पासून पुन्हा आंदोलन सुरू होण्याची टांगती तलवार विद्यापीठ प्रशासनावर आहे. त्यामुळे आता संघटनांनी आंदोलन मागे घेतले तरी परीक्षांबाबतचा संभ्रम कायम आहे.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा सुरू

मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, विभाग आणि दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील (आयडॉल) अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा गुरूवारपासून सुरू झाल्या. विद्यापीठाने महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षांची जबाबदारी महाविद्यालयांचे समूह करून त्यांच्यावर सोपवली आहे. यातील काही महाविद्यालयांच्या परीक्षा गुरूवारपासून सुरू झाल्या. त्याचप्रमाणे विद्यापीठाचे विभाग आणि आयडॉलच्या परीक्षांचीही सुरूवात झाली. ऑनलाइन पद्धतीने बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येत आहेत. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमधील संभ्रम, काही ठिकाणी तांत्रिक अडचणी वगळता बहुतेक महाविद्यालयांमध्ये परीक्षांचा पहिला दिवस सुरळीत पार पडला आहे. परीक्षांचे नियमन करण्यासाठी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली निरीक्षण समिती तयार करण्यात आली असून त्यात प्र-कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनेद पाटील, सर्व अधिष्ठाता, जिल्हानिहाय समन्वयक, प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ यांचा समावेश आहे. विभाग, महाविद्यालयांचे ९४ समूह यांनी परीक्षांबाबतच्या घडामोडींची माहिती या समितीला रोज द्यायची आहे.