कुलगुरूंच्या वक्तव्याने विद्यापीठातील प्राध्यापकांमध्ये नाराजी

‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ’ अशी मराठीत म्हण आहे. मात्र मुंबई विद्यापीठाच्या गणित विभागात उलटाच प्रकार घडला आहे. दोघांच्या भांडणाची शिक्षा इतर दहा जणांना भोगावी लागत आहे. या संदर्भात कुलगुरूंकडे झालेल्या बैठकीत कुलगुरूंनी प्राध्यापकांना तुम्ही काम करत नसाल तर गणित विभाग बंद करू असा इशारा देत विद्यापीठ प्रशासनाने विभागातील बाराही प्राध्यापकांना ‘मेमो’ दिला. यामुळे विभागातील प्राध्यापकांचे ‘गणित’ कोलमडले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या गणित विभागामध्ये डॉ. ज्योत्स्ना प्रजापत या विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. २२ एप्रिल रोजी त्यांना या पदावरून काढून तेथे डॉ. पावले यांची नियुक्ती करण्यात आली. तेव्हा प्रजापत यांनी डॉ. पावले यांना पदाचा कार्यभार सुपूर्द केला. मात्र डॉ. पावले यांनी कार्यभार सुपूर्द न केल्याचे कारण देत कामकाज सुरू करण्यास नकार दिला. यानंतर विद्यापीठाने २७ मे रोजी डॉ. पावले यांनाही पदावरून हटवून डॉ. ऐथल यांची त्या पदी नियुक्ती केली. ६ जून रोजी शैक्षणिक वर्ष सुरू झाले. मात्र ऐथल यांनी कोणतीही सभा न घेतल्याने विभागाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांचे प्रवेशाचे आणि व्याख्यानांचे वेळापत्रक बनवण्याची प्रक्रिया कोलमडली. यासंदर्भात प्राध्यापकांनी विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. यानंतर ४ जुलै रोजी विद्यार्थ्यांनी विभागाच्या या कारभाराबद्दल कुलगुरूंकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत कुलगुरूंनी आंबेडकर भवनात ५ जुलै रोजी विभागातील सर्व प्राध्यापकांची तातडीची बैठक बोलावली.

या बैठकीत एमएस्सी भाग एक आणि दोनच्या प्रवेशाचे आणि तासिकांचे वेळापत्रक तयार न झाल्याची जबाबदारी विभागप्रमुख ऐथल यांच्यावर निश्चित करण्यात आली. यानंतर कुलगुरूंनी सर्व प्राध्यापकांना शैक्षणिक कामे सुरू करण्याचे तोंडी आदेश दिले. हे आदेश देत असतानाच कुलगुरूंनी जर हा विभाग बंद करण्याची भाषा वापरल्याची प्राध्यापकांची तक्रार आहे. प्रत्यक्षात या विभागात ३५० विद्यार्थी शिक्षण घेत असून अशी कोणती परिस्थिती आली की कुलगुरूंना असे वक्तव्य करावे लागले याबाबत प्राध्यापकांना प्रश्न निर्माण झाला आहे.

कुलगुरूंच्या तोंडी आदेशानुसार प्राध्यापकांनी विभागात वेळापत्रक बनवून काम करण्यास सुरुवात केली. मात्र १२ जुलै रोजी विद्यापीठ प्रशासनाने सर्व बारा प्राध्यापकांना मेमो पाठवून स्पष्टीकरण मागितले. थेट मेमो दिल्यामुळे प्राध्यापकांना धक्काच बसला. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला विचारणा केली असता प्रशासनाने ‘मेमो’ हा शब्द चुकून टंकलिखित झाला असून प्रत्यक्षात खुलासा मागविण्यात आल्याचे स्पष्ट केले. मात्र हा मेमो मागे घ्यावा अशी प्राध्यापकांची मागणी आहे.

  • विद्यापीठात सुरू असलेली हुकूमशाही खपवून घेतली जाणार नसून या सर्व प्राध्यापकांना देण्यात आलेला ‘मेमो’ मागे घ्यावा अशी मागणी मुप्ता या संघटनेने केल्याचे संघटनेचे महासचिव आणि अधिसभेचे माजी सदस्य डॉ. विजय पवार यांनी सांगितले.
  • प्राध्यापकांनी २५ दिवस अध्यापनाचे काम केले नसले तरी ७ जून रोजी परीक्षा संपल्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे काम आणि पीएच.डी. तसेच एम.फिलच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचे काम सुरू असल्याचे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.
  • यासंदर्भात कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता प्राध्यापक २५ दिवस अध्यापनाचे काम करत नसतील तर त्यांना उत्तर विचारणे हे विद्यापीठ प्रशासनाचे काम आहे. राहिला प्रश्न सभेतील वक्तव्याचा तर विभाग बंद करण्याचे कोणतेही वक्तव्य केले नसून सध्या नियुक्ती केलेले प्राध्यापक काम करत नसतील तर बाहय़ प्राध्यापक नेमून विभागाचे काम चालविले जाऊ शकते असे नमूद केल्याचेही डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.