मुंबई विद्यापीठाचे मूल्यांकनाचे काम अद्याप ५० टक्केच

मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या परीक्षांमुळे यंदाही निकाल लांबून नव्या शैक्षणिक वर्षांच्या वेळापत्रकाचाही बोजवारा उडणार असल्याची चिन्हे आहेत. जून-जुलैमध्ये विद्यापीठाचे निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. परंतु, विद्यापीठाची यंत्रणा अद्याप मूल्यांकनाच्या कामातच गुंतली असल्याने यंदाही निकाल ऑगस्ट-सप्टेंबपर्यंत लांबण्याची शक्यता आहे.

राज्यातील इतर विद्यापीठांचे निकाल जाहीर झाले तरी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षाही अद्याप उरकलेल्या नाहीत. आधीच्या लांबलेल्या निकालांमुळे उशीरा सुरू झालेले शैक्षणिक सत्र आणि अभ्यासाला मिळालेला अपुरा वेळ यामुळे परीक्षेचे वेळापत्रक बदलण्याची वेळ विद्यापीठावर येत आहे. त्यात कशाबशा पार पडलेल्या परीक्षांच्या निकालाचे कामही रडतखडत सुरू असल्याने मूल्यांकन अवघे ५० ते ६० टक्केच झाल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्यातील बहुतेक सर्व विद्यापीठात अनेक अभ्यासक्रमांची पुढील वर्षांची प्रवेश प्रक्रियाही सुरू झाली आहे. मात्र मुंबई विद्यापीठात निकाल सोडाच, काही विषयांच्या परीक्षांचाही अद्याप पत्ता नाही. त्यातच वाणिज्य पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एम कॉम) आधीच्या सत्राचे परीक्षेचे निकाल रखडल्यामुळे आता तिसऱ्या सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे. एमकॉमच्या १९ जून रोजी सुरू होणाऱ्या परीक्षा आता २९ जूनपासून सुरू होणार आहेत.

विद्यापीठाच्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या सत्र परीक्षांचे सर्व निकाल जाहीर होण्यास जूनचा पहिला आठवडा उजाडला. त्यामुळे पुढील परीक्षांचे वेळापत्रक आणि या सत्राच्या मूल्यांकनावरही त्याचा परिणाम झाला आहे. वाणिज्य शाखेच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे आधीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास, तयारी करण्यास वेळ मिळावा, यासाठी या सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे परीक्षा विभागाचे उपकुलसचिव विनोद माळाळे यांनी सांगितले. ‘सध्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम आटोक्यात आले असून पुढील आठवडय़ापासून निकाल जाहीर होण्यास सुरूवात होईल, असेही त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या या सत्राचे निकालही रखडलेलेच आहेत. परीक्षा होऊन ४५ दिवस उलटले तरीही निकाल जाहीर झालेले नाहीत.

परीक्षाघोळ..

  • मुंबई विद्यापीठाकडून जवळपास ४०० परीक्षा घेण्यात येतात.
  • त्यापैकी अद्याप १२ ते १५ परीक्षांचेच निकाल जाहीर.
  • मात्र मुळात विद्यार्थीसंख्या कमी असलेल्या या परीक्षा आहेत.
  • वाणिज्य, कला, विज्ञान या मोठय़ा शाखांच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम अद्याप ५० ते ६० टक्केच.
  • त्यामुळे या सत्राचे निकाल रखडण्याची शक्यता.