विमानतळाला महात्मा बसवेश्वरांचे, रेल्वे स्थानकाला सिद्धेश्वरांचे नाव देणार

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यावरून सोलापूर जिल्ह्यत लिंगायत समाज आणि धनगर समाज यांच्यात सुरू झालेल्या वादावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अखेर शनिवारी तोडगा निघाला आहे. विद्यापीठाच्या नावाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार ३१ मे रोजी अहिल्यादेवी जयंतीचे औचित्य साधून करण्यात येणार आहे. तर विमानतळाला महात्मा बसवेश्वर  विमानतळ असे नाव देण्यात येईल. त्याचबरोबर लिंगायत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे.

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर त्यावरून सोलापुरातील लिंगायत समाज नाराज झाला. त्यावरून लिंगायत व धनगर समाजात वाद सुरू होऊन धरणे, मोर्चे असे आंदोलन झाले. या पाश्र्वभूमीवर वादावर तोडगा काढण्यासाठी विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. मंत्रालयात शनिवारी शिवा संघटनेच्या वतीने वीरशैव लिंगायत समाजाचे प्रतिनिधी आणि धनगर समाजाचे प्रतिनिधी यांच्यासह दोन्ही समाजाच्या मागण्यांबाबत विनोद तावडे यांनी बैठक घेतली.

या बैठकीस धनगर समाज विकास परिषदेचे अध्यक्ष गणेश हाके, शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे, माजी आमदार शिवशरण पाटील-बिराजदार, राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोडतले, यशवंत उद्योजकचे अध्यक्ष ललित बंडगर, शिवा महिला आघाडीच्या अध्यक्ष वैशाली लाठे आदी उपस्थित होते.

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात येत असेल तर नवीन विमानतळास महात्मा बसवेश्वरांचे नाव देण्यात यावे आणि सोलापूर रेल्वे स्थानकाला सिद्धेश्वरांचे नाव द्यावे, अशी मागणी लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाने केली. त्याचबरोबर वीरशैव लिंगायत समाजातील तरुण-तरुणींना उद्योग सुरू करण्यासाठी मदत करण्यासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून महामंडळास दरवर्षी १०० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. सरकारला या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेईल, असे विनोद तावडे यांनी सांगितल्यानंतर सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्यावर सर्वसहमती झाली.

दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी सामंजस्याने समाजाच्या हिताचा निर्णय घेतल्याचे सांगत विनोद तावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. सोलापूर रेल्वे स्टेशनला श्री सिद्धेश्वर रेल्वे टर्मिनस असे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकार रेल्वे प्रशासनास पाठविणार असल्याचे तावडे म्हणाले.

सोलापूर येथे महात्मा बसवेश्वर यांच्या भव्य राष्ट्रीय स्मारकाची घोषणा झाली असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून पुढील कार्यवाहीबाबत अंमलबजावणी करण्यात येईल. महात्मा बसवेश्वर जयंतीला महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार व्यक्ती व संस्था यांना विशेष कार्यासाठी देण्यात यावा, असे निर्णय घेण्यात आले असल्याचेही तावडे यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यत लिंगायत समाज आणि धनगर समाज यांच्यात सुरू झालेल्या वादावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अखेर शनिवारी तोडगा निघाला आहे. विद्यापीठाच्या नावाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार ३१ मे रोजी अहिल्यादेवी जयंतीचे औचित्य साधून करण्यात येणार आहे. तर विमानतळाला महात्मा बसवेश्वर  विमानतळ असे नाव देण्यात येईल.