राज्य सरकारच्या मेस्मा अंतर्गत दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्याला न जुमानता विद्यापीठ परीक्षांवर बहिष्काराचे सत्र कायम ठेवण्याचा निर्णय प्राध्यापकांनी घेतल्याने गुरूवारी केवळ ५० टक्के परीक्षा केंद्रांवर तृतीय वर्ष विज्ञानाच्या (बीएससी) प्रात्यक्षिक परीक्षा पार पाडू शकल्या. मुंबई विद्यापीठातर्फे प्राणीशास्त्र, सुक्ष्मजीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जैवतंत्रज्ञान, रसायनशास्त्र आणि संगणकशास्त्र या विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षा गेला आठवडाभर सुरू आहेत. परंतु, प्राध्यापकांच्या असहकारामुळे केवळ ४० ते ५० परीक्षा केंद्रांवर प्रात्यक्षिक परीक्षा घेणे विद्यापीठाला शक्य झाले आहे.
गुरूवारी या सहा विषयाच्या ८४ केंद्रांवर प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्यापैकी केवळ ४३ केंद्रांवर परीक्षा सुरळीतपणे घेता आल्या. उर्वरित ४१ केंद्रांवर प्राध्यापकांच्या असहकारामुळे परीक्षा पार पडू शकलेल्या नाहीत. ज्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा होऊ शकल्या नाहीत, तेथे नवीन वेळापत्रकानुसार परीक्षा घेतल्या जातील, असे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांनी सांगितले.