19 October 2019

News Flash

विद्यापीठाच्या विमान खरेदीवरून वादाची उड्डाणे

आपल्या गरवारे संस्थेद्वारे हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा विद्यापीठाचा विचार आहे.

तब्बल दीड कोटी रुपये खर्च करून चार आसनी विमान खरेदी करण्याचा मुंबई विद्यापीठाचा विचार आहे

विमान उड्डाण आणि व्यावसायिक वैमानिकांकरिता बीएस्सी अभ्यासक्रम चालविण्याकरिता थेट विमान विकत घेण्याचा विचार मुंबई विद्यापीठ व्यक्त करीत नाही तोच यावरून वादाची उड्डाणे सुरू झाली आहेत.
आपल्या गरवारे संस्थेद्वारे हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा विद्यापीठाचा विचार आहे. परंतु विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या गरवारेच्या अनेक अभ्यासक्रमांना बाजारात मागणी असूनही योग्य व्यवस्थापनाअभावी उतरती कळा लागली आहे. या अभ्यासक्रमांना वाचविण्याऐवजी दीड कोटी रुपयांचे विमान विकत घेऊन विद्यापीठाला नेमक्या कुठल्या विद्यार्थ्यांचे भले करायचे आहे, अशी चर्चा विद्यापीठात सुरू झाली आहे.
‘शिवसेना’प्रणीत ‘युवा सेना’ व ‘मनसे’प्रणीत ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना’ (मनविसे) यांनी हा विरोधाभास अधोरेखित करत विमान खरेदीला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे.
मंगळवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. विद्यापीठाशी संलग्नित बॉम्बे फ्लाईंग क्लबच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. यातच विद्यार्थ्यांना कृतिशील प्रशिक्षण मिळण्याच्या उद्देशाने एअरक्राफ्ट विकत घेण्याच्या मुद्दय़ावरही चर्चा झाली.
तब्बल दीड कोटी रुपये खर्च करून चार आसनी विमान खरेदी करण्याचा मुंबई विद्यापीठाचा विचार आहे. परंतु, मुंबईत विमान उड्डाण आणि व्यावसायिक वैमानिकांकरिता क्लबच्या बरोबरीनेच अन्य तीन संस्था अभ्यासक्रम राबवीत असताना विद्यापीठाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात उपयोग काय, असा सवाल मनविसेचे सुधाकर तांबोळी यांनी केला. खरेतर २००९मध्येच हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. मात्र काही कारणांमुळे तो प्रत्यक्षात येऊ शकला नाही. विमान खरेदी करण्यासाठीचा निधी विद्यापीठ कुठून आणणार आहे, हे विमान ठेवणार कुठे, उडविण्याकरिता धावपट्टी आणणार कुठून, असे सवाल युवा सेनेचे प्रदीप सावंत यांनी केले.

First Published on February 11, 2016 3:05 am

Web Title: university purchased the aircraft dispute
टॅग University