टीवायबीकॉम, टीवायबीए स्सीच्या निकालाच्या तारखा पाळण्यात अपयश

आपल्या बीएससी, बीकॉम, बीए या महत्त्वाच्या परीक्षांच्या निकालाच्या तारखा आगाऊ जाहीर करून आदर्श पायंडा पाडण्याच्या मुंबई विद्यापीठाच्या योजनेचा पहिल्याच वर्षी फज्जा उडाल्याचे चित्र आहे. कारण, १० जूनला आपल्या टीवायबीकॉम आणि टीवायबीएस्सी या दोन महत्त्वाच्या परीक्षांच्या निकालाच्या तारखा पाळण्यात विद्यापीठाला अपयश आले आहे. केवळ टीवायबीएस्सीच्या पाचव्या सत्राचाच निकाल काय तो विद्यापीठाला दिलेल्या तारखेला म्हणजे १० जूनला सायंकाळी जाहीर करता आला. तर टीवायबीएस्सीच्या सहाव्या सत्राचा निकाल शनिवारी लावण्याचा विद्यापीठाचा विचार आहे. परंतु, टीवायबीकॉम या महत्त्वाच्या निकालाकरिता विद्यार्थ्यांना २४ जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

अभियांत्रिकी उत्तरपत्रिका घोटाळ्यात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची नाचक्की झाल्याच्या पाश्र्वभूमीवर विद्यापीठाने अनपेक्षितपणे आपल्या टीवायबीकॉम, टीवायबीएस्सी या परीक्षांचे निकाल १० जूनला तर टीवायबीएचा निकाल २० तारखेला जाहीर करू, असे १ जूनला जाहीर केले. परंतु, टीवायबीकॉम, टीवायबीएस्सी यापैकी एकाही परीक्षेचा निकाल विद्यापीठाला धडपणे दिलेल्या तारखेला जाहीर करता आलेला नाही. त्यामुळे, निकालाच्या तारखा आगाऊ जाहीर करून आपली गेलेली पत सावरण्याचा तसेच आपले परीक्षाविषयक नियोजन किती सुधारले आहे हे दाखविण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न अगदीच दुबळा ठरला आहे.

परीक्षा झाल्यावर नियमाप्रमाणे ४५ दिवसांच्या आता निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. मात्र, गेली अनेक वर्षे अनेक विषयांच्या बाबतीत हे बंधन पाळणे विद्यापीठाला शक्य झालेले नाही.

टीवायबीकॉमला सर्वाधिक ७० ते ७५ हजार विद्यार्थी बसतात. त्यामुळे, या परीक्षेचा निकाल तयार करणे कायम जिकरीचे बनते. आताही या विषयाच्या सहाव्या सत्राच्या उत्तरपत्रिका तपासून तयार आहेत. मात्र, आधीच्या परीक्षांचे, पुनर्मूल्यांकनाचे गुण समाविष्ट करण्याचे राहिले असल्याने निकाल जाहीर करता येणार नाही, असा खुलासा विद्यापीठाने केला आहे.