पालिकेच्या आरोग्य खात्याची कबुली

भारतीय पदार्थविषयक यादीमध्ये ड्रॅगन फ्रूट आणि किवी या फळांचा समावेश नसल्यामुळे त्यांच्या पौष्टिक घटकांची माहिती नसल्याची कबुली पालिकेच्या आरोग्य खात्याने चक्क आरोग्य समितीला दिली आहे. इतकेच नव्हे तर पपई कापून देताना रोगजंतूंचा प्रादुर्भाव आणि जीवनसत्त्वांचा ऱ्हास होण्याची शक्यता असल्याने ते रुग्णांना देणे सोयिस्कर नसल्याचेही पालिकेच्या आरोग्य खात्याने नमूद केले आहे.

पालिकेच्या नायर, केईएम आणि शीव या तीन मुख्य रुग्णालयांसह उपनगरांतील रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने आणि आरोग्य केंद्रांवर मोठय़ा संख्येने उपचार घेण्यासाठी रुग्ण येत असतात. परराज्यांतील बहुसंख्य रुग्ण उपचारासाठी नायर, केईएम आणि शीव रुग्णालयांमध्ये दाखल होतात. त्यामुळे या तिन्ही रुग्णालयांवर प्रचंड ताण पडत आहे. रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणारे बहुसंख्य रुग्ण गरीब कुटुंबातील असून या रुग्णांना उपचार घेताना पौष्टिक फळे विकत घेणे आर्थिकदृष्टय़ा शक्य होत नाही. त्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या आंतररुग्णांच्या सकाळच्या किंवा संध्याकाळच्या आहारात ड्रॅगन फ्रूट, किवी, पपई इत्यादी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या पौष्टिक फळांचा समावेश करावा, अशी मागणी नगरसेवक सुषमा सावंत यांनी ८ मे २०१८ रोजी केली होती. नगरसेविका प्रियांका मोरे यांनी अनुमोदन दिलेली ही ठरावाची सूचना पालिका सभागृहाने एकमताने मंजूर करून पालिका प्रशासनाकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आली होती.

वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांच्या संचालक कार्यालयाकडून या ठरावाच्या सूचनेवर अभिप्राय सादर करण्यात आला आहे. पालिका रुग्णालयांच्या आहारतज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार पपई हे फळ कापून देताना रोगजंतूंचा प्रादुर्भाव, तसेच जीवनसत्त्वांचा ऱ्हास होण्याची शक्यता असल्याने हे फळ आंतररुग्णांना पुरविणे सोयिस्कर होणार नाही, असे पालिकेच्या आरोग्य खात्याने आपल्या अहवालात नमूद करीत ही ठरावाची सूचना निकालात काढली आहे.

पदार्थविषयक यादीमध्ये ड्रॅगन फ्रूट, किवी फळांचा उल्लेख नाही

पालिका रुग्णालयात दाखल करून घेण्यात येणाऱ्या रुग्णांना आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पौष्टिक पदार्थ, भाज्या इत्यादींचा समावेश असलेले जेवण देण्यात येते. रुग्णांना महाराष्ट्रात पिकणारी हंगामी, तसेच बारमाही फळे देणे उचित असून इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूट्रिशन यांच्या भारतीय पदार्थविषयक यादीमध्ये ड्रॅगन फ्रूट आणि किवी या फळांचा उल्लेख नाही. त्यामुळे या फळांमधील पौष्टिक घटकांची माहिती उपलब्ध नाही.