संदीप आचार्य

टाळेबंदी शिथिल केल्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी सोशल डिस्टंसिंगचे सर्व कायदे पायदळी तुडवल्याचे जागोजागी पाहायला मिळाले. अनेक रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली होती. तर बसेसमध्ये निर्धारित प्रवशांपेक्षा कितीतरी जास्त गर्दी झाली होती. या पार्श्वभूमीवर जून आणि जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात करोनाचा फैलाव होण्याची भीती आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसंच करोनाला अटकाव करण्यासाठी करोनाच्या चाचण्यांची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढविण्याची गरज तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

मुंबईत करोनाच्या रुग्णांची संख्या आता ५० हजार पार झाली असून जून अखेरीस मुंबईत एक लाखाहून अधिक रुग्ण झालेले असतील, अशी भीती या डॉक्टरांकडून वक्त होत आहे. “दुर्देवाने समाजातील उच्चभ्रू वर्गही वास्तवाची जाणीव बाळगायला तयार नाही हे मरिन ड्राइव्ह येथे रस्त्यावर व्यायामासाठी बाहेर आलेल्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली त्यावरून स्पष्ट होते,” असे राज्याच्या मुख्य सचिवांचे प्रमुख आरोग्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले.

“मुंबई, ठाणे पुणे येथे टाळेबंदी शिथील केल्याच्या पहिल्या दिवशी जे चित्र पाहायला मिळाले ते लक्षात घेता करोना रुग्णांच्या संख्येत आगामी काळात मोठी वाढ होईल हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही,” असेही डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले. याशिवाय काही दिवसांपूर्वी मुंबई-पुण्यातून मोठ्या संख्येने मजुर व कष्टकरी वर्ग आपापल्या जिल्ह्यातील गावी परत गेल्यामुळे अनेक जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याचे आकडेवारीवरून दिसून येत असून याचा विचार करता आता करोना चाचण्यांची व्याप्ती वेगाने वाढवण्याची गरज असल्याचे डॉ. साळुंखे म्हणाले.

मुंबईत दररोज सरासरी ११,३४६ चाचण्या

मुंबईत १ मे ते ८ जूनपर्यंत ४,४२,५०० चाचण्या करण्यात आल्या असून दररोज सरासरी ११,३४६ चाचण्या होतात. राज्यात ८८ करोना चाचणी प्रयोगशाळा असून यात ४९ सरकारी तर ३९ खाजगी प्रयोगशाळा आहेत. त्यात सुमारे ३० ते ३५ हजार चाचण्या करण्याची क्षमता असताना केवळ साडेअकरा हजार चाचण्या आज होत आहेत. आम्ही आयसीएमआर च्या मार्गदर्शक तत्वानुसार चाचण्या करतो असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. “या ८८ प्रयोगशाळांची चाचणी करण्याची क्षमता निम्म्यानेही वापरली जात नसतानाही रोजच्या रोज होत असलेल्या चाचण्या आणि करोनाबाधितांची संख्या निश्चित विचार करायला लावणारी आहे. तसंच जास्तीतजास्त चाचण्या झाल्या पाहिजे,” असे मुंबईसाठी नेमलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी सांगितले.

“आयसीएमआरने चाचण्यांबाबत जी मार्गदर्शक तत्त्वे चाचणीसाठी निश्चित केली आहेत, त्या अंतर्गतही मोठ्या संख्येने चाचण्या करणे गरजेचे आहे. अन्यथा जुन व जुलैत मुंबईच्या चित्र वेगळे दिसेल,” असे डॉ. संजय ओक यांनी सांगितले. खाजगी प्रयोगशाळा करोना चाचणीसाठी साडेचार हजार ते पाच हजार रुपये आकारत असून हे दर कमी करण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्यचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. हे दर कमी झाल्यानंतर लक्षण नसलेल्यांचीही चाचणी व्हायला हवी, असे मत टास्क फोर्सचे सदस्य व लीलावती रुग्णालयातील मधुमेहतज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केलं.

“लक्षण नसलेले रुग्णच करोनाचा मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रसार करू शकतात हे लक्षात घेऊन आयसीएमआरनेही त्यांच्या मार्गदर्शक तत्वाची नव्याने आखणी करणे गरजेचे आहे. खासकरून मुंबईसारखी प्रचंड लोकसंख्या व घनता असलेल्या शहरांसाठी नियमावलीत दुरुस्ती केली पाहिजे,” असे डॉ. जोशी म्हणाले. “प्रयोगशाळांची संख्या व चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवणे गरजेचे आहे, अन्यथा आपण आपली फसवणूक केल्यासारखे होईल,” असेही त्यांनी नमूद केले.

पालिकेकडून जास्तीत जास्त चाचण्या

“मुंबई महापालिकेने पहिल्या दिवसापासून जास्तीतजास्त चाचण्या केल्या आहेत. किंबहुना देशात सर्वाधिक चाचण्या मुंबईने केल्या आहेत. त्यातूनच जास्तीतजास्त लोकांवर उपचार करता आले व करत आहोत. आयसीएमआरच्या निकषांनुसार चाचण्या होत असून गरज वाटल्यास चाचण्यांची व्याप्ती वाढवली जाईल,” असे पालिकेचे सहआयुक्त रमेश पवार यांनी सांगितले.