आदिवासी समाजातील मुलींचे धनदांडग्यांकडून लैंगिक शोषण होते ही बातमी धादांत खोटी असून, कुमारी माता ही समस्याच नाही, तो आदिवासी समाजाच्या जीवनपद्धतीचा एक भाग आहे, असे स्पष्टीकरण राज्य महिला आयोगाच्या सदस्या डॉ. आशा मिरगे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी केले आहे.
फेब्रुवारीमध्ये झालेल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीतील माहितीच्या आणि यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या अहवालावर आधारित लोकसत्तामधून कुमारी मातांच्या संदर्भात वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्याला आशा मिरगे व विद्या चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. कंत्राटदार किंवा धनदांडग्यांकडून आदिवासी मुलींचे शोषण होत नाही, असा त्यांनी दावा केला आहे.
यवतमाळ जिल्ह्य़ातील झरीजामणी, पांढरकवडा, मारेगाव, वणी, इत्यादी ठिकाणच्या आदिवासी पाडय़ांवर जाऊन प्रत्यक्ष काही कुमारी मातांची भेट घेऊन चर्चा केली, त्या वेळी बाहेरील कुणी कंत्राटदार किंवा धनदांडगे त्यांचे लैंेगिक शोषण करतात अशी कुणाचीही तक्रार नव्हती.
मात्र अशा बातम्या आल्यामुळे आदिवासी समाजाची बदनामी होत आहे, असे मिरगे व चव्हाण यांचे म्हणणे आहे.