पदव्युत्तर अभ्यासक्रमाबाबत आयुर्विज्ञान परिषदेकडून नवे नियम लागू

सध्या असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांना आता अस्तित्व राखण्यासाठी येत्या दोन वर्षांत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परवानगी मिळवावी लागणार आहे. त्याचप्रमाणे नवे वैद्यकीय महविद्यालय सुरू झाल्यापासून संस्थांना तीन वर्षांत वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावा लागणार आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने हा नियम केला असून आता मुळात पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या पायाभूत सुविधांमध्ये महाविद्यालयांना सुधारणा करावी लागणार आहे.

देशांतील वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळाच्या गरजेच्या तुलनेत आणि विद्यार्थ्यांच्या मागणीच्या तुलनेत पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या जागा कमी आहेत. त्यासाठी आता प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाने पदव्युत्तर अभ्यासक्रमाची किमान एक तुकडी सुरू करण्याचे बंधन परिषदेने घातले आहे. नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना पदवी (एमबीबीएस) अभ्यासक्रम सुरू झाल्यापासून तीन वर्षांत पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परवानगी मिळवणे बंधनकारक आहे. सध्या पदवी अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयांनाही दोन वर्षांत म्हणजे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पर्यंत पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी परवानगी मिळवणे बंधनकारक आहे. ज्या महाविद्यालयांना दिलेल्या मुदतीत पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करता येणार नाही, त्यांची पदवी अभ्यासक्रमांची मान्यताही काढून घेण्यात येईल असे परिषदेकडून सांगण्यात आले आहे.

महाविद्यालयांचे धाबे दणाणले..

पदवी अभ्यासक्रमासाठी असलेल्या पायाभूत सुविधांमध्येच पदव्युत्तर अभ्यासक्रमांची एक तुकडी सुरू करू शकतात. मात्र, पदव्युत्तर अभ्यासक्रमांना शिकवण्यासाठी प्राध्यापकांचे पात्रतेचे निकष पदवीच्या शिक्षकांपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे दोन वर्षांत महाविद्यालयांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांना शिकवण्यासाठी पात्र शिक्षक शोधावे लागणार आहेत. पदवी अभ्यासक्रमांसाठी आवश्यक सुविधाही काटेकोरपणे उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. पदवी अभ्यासक्रमांसाठी परवानगी देताना महाविद्यालयाची सर्वंकष पाहणी केली जाते. त्यामध्ये अनेकदा पायाभूत सुविधांमधील त्रुटी बाहेर येतात आणि महाविद्यालये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचे टाळतात, असे वैद्यकीय शिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

हमीपत्राची पळवाट बंद होणार?

गोंदिया, चंद्रपूर, धुळे आणि कोल्हापूर येथील शासकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम नाही. दरवर्षी ‘यंदापासून पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल,’ असे हमीपत्र संचालनालयाला देऊन या महाविद्यालयांचा कारभार सुरू आहे. ही पळवाट कधी बंद होणार हा प्रश्न आहे.

नियमानुसार आता महाविद्यालयांना पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावा लागेल. त्यामुळे पदव्युत्तरच्या जागा वाढतील. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या किमान जागांसाठी सारखेच निकष आहेत. किमान जागांपेक्षा अधिक जागा एखाद्या महाविद्यालयाला हव्या असतील तर त्यासाठी महाविद्यालयांना अतिरिक्त सुविधा उपलब्ध कराव्या लागतात. मात्र पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शिक्षकांसाठी पात्रतेचे निकष फक्त वेगळे आहेत.

– डॉ. प्रवीण शिनगारे, वैद्यकीय शिक्षण संचालक