गेले काही दिवस सकाळी आणि उत्तररात्री गारव्याचा अनुभव घेणाऱ्या मुंबईकरांना रविवारी संध्याकाळी अचानक आलेल्या पावसाने कोडय़ात टाकले. मुंबई, ठाणे, कल्याण आदी परिसरात रविवारी संध्याकाळी काही वेळ हलकासा पाऊस पडला. हवेच्या खालच्या थरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे (अप्पर एअर टर्फ) हा पाऊस पडल्याचे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले. या अवकाळी पावसामुळे गारवा कमी होऊन उकाडा वाढण्याची शक्यता आह़े
दक्षिण तामिळनाडूपासून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकचा काही भाग येथे आकाशात हवेच्या खालच्या थरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे वेधशाळेने रविवारी दुपारनंतर पावसाची शक्यता वर्तवली होती. त्याप्रमाणे पावसानेही रविवारी संध्याकाळी मुंबई आणि परिसरात हजेरी लावली. हा पाऊस जोरदार नसला, तरी बराच काळ पडला. येत्या २४ तासांतही अजून थोडा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या हलक्याशा शिंतडलेल्या पावसामुळे मुंबईकर चक्रावून गेले. रविवारी संध्याकाळी मरिन ड्राइव्हवर फिरायला आलेल्या लोकांनी या हलक्या सरींमध्ये भिजण्याचा आनंदही लुटला.
या पावसामुळे किमान तापमानात वाढ आणि कमाल तापमानात घट होणार असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. कमाल तापमानात घट झाली, तरीही किमान तापमान आणि हवेतील आद्र्रता यांच्यात झालेल्या वाढीमुळे मुंबईकरांना उकाडय़ाचा सामना करावा लागेल, असेही वेधशाळेने स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कपाटाच्या बाहेर आलेल्या शाली, मफलर आणि स्वेटर पुन्हा कपाटात ठेवावे लागणार आहेत.