गेल्या काही वर्षांत हवामान बदलाचे चटके आपल्याला सहन करावे लागत आहेत. फेब्रुवारी महिन्यात गारपीट, अवकाळी पाऊस, एकाच दिवशी हिवाळा, पावसाळा अन् उन्हाळा या तिन्ही ऋतूंचा अनुभव अनेकांनी घेतला. आता उन्हाळ्याला सुरुवात झाली असताना मार्च महिन्यातही हेच चित्र दिसत आहे. मध्यरात्रीपासून मुंबईतील काही भागात अवकाळी  पावसाने हजेरी लावली.
वसई-विरारमध्ये सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. अंधेरी, विलेपार्ले, कांदिवली, सांताक्रुझ, वांद्रे, डोंबिवली, बदलापूर भागात पावसाच्या सरी कोसळल्या. ठाण्यात विजांचा कडकडाट होत असून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तर पालघर जिल्ह्यात तुरळक पाऊस पडला.
दरम्यान, गेले चार दिवस नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक वर्षांनंतर या परिसरात अचानक गारपीट झाली असून द्राक्षासह कांदा, गहू, हरभरा व भाजीपाल्याचेही नुकसान झाले असून आंब्याच्या झाडावरील मोहोर गळून पडला आहे.