अरबी समुद्रानजीक तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्यात सर्वत्र पावसाच्या तुरळक सरी शनिवारीही सुरू राहिल्या. मात्र रविवारपासून या पट्टय़ाची तीव्रता कमी होणार असून कोकण व मध्य महाराष्ट्र वगळता इतरत्र पावसाचे प्रमाण कमी होईल. दोन दिवसांनंतर आकाश नीरभ्र होईल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. पावसामुळे मुंबईतील तापमान सहा ते सात अंश सेल्सिअसनी घटले आहे. तापमानातील या बदलांमुळे विषाणूसंसर्गाचा धोका वाढल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
गुरुवारपासून अचानक सुरू झालेल्या पावसाच्या तुरळक सरी शनिवारीही राहिल्या. कुलाबा येथे दिवसभरात ०.४ मिमी तर सांताक्रूझ येथे २.२ मिली पावसाची नोंद झाली. मुंबई व परिसरात रविवारीही ढगाळ वातावरण राहणार असले तरी पावसाच्या सरींचा प्रभाव ओसरण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. रविवारी विदर्भातील वातावरण नीरभ्र व कोरडे होणार आहे. मध्य महाराष्ट्र व कोकणात पावसाच्या तुरळक सरींची शक्यता आणखी दोन दिवस आहे, मात्र त्यांचा प्रभाव ओसरेल.  उन्हाने पिचलेले मुंबईकर मात्र आकाश आभ्राच्छादित झाल्याने सुखावले आहेत. सांताक्रूझ येथे ३१.५ अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे चक्क २८.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. पावसाचा प्रभाव ओसरल्यास पारा पुन्हा एकदा वर जाईल.
विषाणूसंसर्ग वाढण्याची शक्यता
ऑक्टोबर महिन्यापासून पाऊस, गारवा, तापमानातील वाढ यांची सरमिसळ सुरू असल्याने विषाणूंची संख्या वाढण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. उष्ण व कोरडय़ा हवेत विषाणूंची वाढ अधिक होते तर पावसाचे पाणी साठल्याने विषाणू पसरवणाऱ्या डासांची पैदास मोठय़ा प्रमाणावर होते. या पावसामुळे पाणी साठून डासांची पैदास होण्यास तसेच सोमवारपासून पुन्हा वाढणाऱ्या तापमानात विषाणूंची संख्या वाढण्यास पोषक वातावरण असेल. त्यामुळे विषाणूसंसर्गामुळे डेंग्यूची साथ पुन्हा वाढण्याची भीती आरोग्यतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
पाऊस का पडत आहे?
संपूर्ण देशात पाऊस देणारा नैऋत्य मान्सून देशातून बाहेर पडला असला तरी दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळसारख्या राज्यात पाऊस पाडणारा ईशान्य मान्सून सक्रीय आहे. सध्या वाऱ्यांची दिशा पूर्वेकडून आहे. गेल्या काही दिवसांत या वाऱ्यांचा प्रभाव अधिक वाढला. जमिनीकडून येणारे उष्ण वारे व पश्चिमेकडील समुद्रावरील तुलनेने थंड वारे यामुळे पश्चिम किनारपट्टीवर गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला. पूर्वेकडून येत असलेल्या वाऱ्यांनी त्यांच्यासोबत ईशान्य मान्सूनचे ढगही आणले. त्यामुळे राज्यात पाऊस पडत आहे. २०१०च्या नोव्हेंबरमध्ये भर दिवाळीत पाऊस पडला होता.