X

मेट्रोसेवा मीरा-भाईंदपर्यंत

दोन्ही मार्गाची एकूण लांबी १३.५८ किमी असून त्यासाठी सुमारे सहा हजार ६०७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

‘एमएमआरडीए’च्या प्रस्तावास सरकारचा हिरवा कंदील

मीरा-भाईंदर आणि मुंबई उपनगरांना जोडणाऱ्या तसेच प्रवासाच्या कालावधीत ४० मिनिटांची बचत करणाऱ्या दहिसर ते मीरा-भाईंदर ‘मेट्रो-९’ आणि अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ‘मेट्रो-७अ’ या दोन्ही प्रकल्पांना मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरवा कंदील दाखविण्यात आला आला. त्यामुळे मुंबई मेट्रो आता थेट भाईंदरमधील सुभाषचंद्र स्टेडियमपर्यंत धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या दोन्ही मार्गाची एकूण लांबी १३.५८ किमी असून त्यासाठी सुमारे सहा हजार ६०७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा मेट्रो मार्ग एकूण १०.४१ किलोमीटर लांबीचा असून पूर्णत: उन्नत स्वरूपाचा आहे. त्यापैकी अंधेरी ते विमानतळ हा मार्ग ३.१७ किलोमीटर लांबीचा असून यामध्ये ०.९८ किमी उन्नत तर २.१९ किमी अंतराच्या भुयारी मार्गिका असणार आहेत. या प्रकल्पांमध्ये १० उन्नत तर एक भुयारी अशी एकूण ११ स्थानके असतील. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) राबविणार आहे. या प्रकल्पांतर्गत केंद्र व राज्य शासनाचे कर आणि जमिनीच्या खर्चासाठी राज्य शासनाकडून एक हजार ६३१ कोटी रुपयांचे बिनव्याजी दुय्यम कर्ज साहाय्य देण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून द्विपक्षीय, बहुपक्षीय, आंतरराष्ट्रीय, आंतरदेशीय, एलआयसी, बॉण्डस् अशा विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले जाणार आहे. या प्रकल्पासाठी लागणारी, शासकीय अथवा निमशासकीय संस्था तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडील जमीन कायम किंवा तात्पुरत्या स्वरूपात नाममात्र दराने देण्याचा निर्णयही घेण्यात आला. या प्रकल्पात बाधित होणाऱ्यांचे पुनर्वसनही एमएमआरडीएच करणार आहे.

मीरा-भाईंदर आणि मुंबई उपनगरांना जोडणाऱ्या या मार्गामुळे प्रवासाच्या कालावधीमध्ये ३० ते ४० मिनिटांची बचत होणार आहे. हा प्रकल्प मार्च-२०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रारंभी आठ लाख ४७ हजार प्रवासी या मार्गाचा प्रतिदिन वापर करतील. तसेच २०३१ पर्यंत ही संख्या ११ लाख इतकी होईल, असा अंदाज आहे. २०२३ पासून अंदाजे १६ हजार २६८ टन इतके कार्बन उत्सर्जन कमी होईल, असा दावा एमएमआरडीएने केला आहे.

किमान भाडे १० रुपये

या प्रकल्पासाठी सुरुवातीचे भाडेदर ०-३ किमी अंतरासाठी १० रुपये, ३-१२ किमीसाठी २० रुपये, १२-१८ किमीसाठी ३० रुपये, १८-२४ किमीसाठी ४० रुपये, २४-३० किमीसाठी ५० रुपये असे असतील.