राज्यातील अंतर्गत भाग उन्हामुळे होरपळून निघत असतानाच गुरुवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आल्या. शुक्रवारी व शनिवारीही कोकणवगळता राज्याच्या उर्वरित भागात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी येण्याचा अंदाज आहे.

देशाच्या मध्य भागात दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा असून त्याच्या समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे या भागात पाऊस पडत आहे. गुरुवारी पूर्व किनारपट्टीवर प. बंगालपासून तामिळनाडूपर्यंत सर्वत्र पावसाच्या सरी आल्या. त्याचप्रमाणे राज्यात कोल्हापूर, सोलापूर येथे संध्याकाळी उशिरा पावसाचा शिडकावा झाला. पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी येणार असून काही ठिकाणी गाराही पडणार असल्याचा अंदाज केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भातील अनेक ठिकाणी कमाल तापमान ४० अंश से. पलीकडे जात आहे.  पावसामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

चंद्रपुरात ४३.२ अंश सेल्सिअस

एप्रिल महिन्यात चंद्रपूर शहरातील तापमानात वाढ  झाली असून  गुरुवारी राज्यातील सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४३.२ अंश से. नोंदले गेले. दरम्यान, सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.