उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वीज कंपन्यांना सूचना; दर वाढवून ग्राहकांची पिळवणूक करणाऱ्या कंपन्यांना कानपिचक्या
मुंबईत ५०० युनिटपर्यंत वीजवापर करणाऱ्या सर्व वीज कंपन्यांच्या ग्राहकांना समान वीजदर ठेवण्याच्या सूचना उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. वीजदर वाढवून ग्राहकांची पिळवणूक करणाऱ्या टाटा, रिलायन्स एनर्जी व बेस्टला उर्जामंत्र्यांनी कानपिचक्या दिल्या.
उर्जामंत्र्यांनी समान वीजदराबाबत ५ फेब्रुवारीला बैठक बोलाविली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरही बैठक घेतली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.
मुंबईत टाटा, रिलायन्स एनर्जी, बेस्ट आणि महावितरण या चारही वीजकंपन्यांचे ग्राहक असून त्यांना वेगवेगळ्या दराने वीजपुरवठा होतो. रिलायन्स एनर्जीची वीज सर्वात महाग असून खासगी कंपन्यांच्या वीजपुरवठय़ाबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. ग्राहकांना समान वीजदराची मागणी अनेक वर्षे रखडली असून आगामी वीजदर प्रस्तावात त्यादृष्टीने ठोस पावले टाकली जाणे अपेक्षित आहे.