‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच’अशी भूमिका मुखपत्रातून मांडणाऱ्या शिवसेनेस ‘मुख्यमंत्री युतीचाच’असे प्रत्युत्तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. या मुखपत्रातील ‘आमचं ठरलंय’ या अग्रलेखातून सेनेने मुख्यमंत्रीपदावर दावा केल्याने, मुख्यमंत्रिपदावरून भाजप-शिवसेनेत आलबेल नाही हे स्पष्ट झाले असून, मुख्यमंत्रीपदाबाबत भाजप मवाळ भूमिका घेणार नाही, असाच संदेशच मुनगंटीवार यांनी दिल्याचे मानले जाते.

लोकसभा निवडणुकीत युतीला चांगले यश मिळाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून शिवसेना मुख्यमंत्रीपदाबाबत वारंवार दावा सांगत आहे. त्यातून भाजपच्या काही नेत्यांनी तिखट टोले लगावल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झाले होते. गिरीश महाजन यांना ठाकरे यांची भेट घेऊन सारवासारव करावी लागली होती. त्यानंतर मुख्यमंत्रीपद, युतीचे जागावाटप या विषयांवर वादग्रस्त विधाने करू नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी युतीच्या आमदारांच्या संयुक्त बैठकीत सांगितले होते. त्याला १५ दिवसही उलटत नाहीत तोच शिवसेनेच्या मुखपत्रातून मुख्यमंत्रीपदाबाबतची आकांक्षा व्यक्त झाली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्रकारांनी याबाबत विचारले असता, मुख्यमंत्री युतीचा होईल. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे तिघे मिळून मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतील, असे उत्तर देत मुनगंटीवार यांनी भाजप हा शिवसेनेच्या दबावतंत्राला बधणार नाही, असा संदेश दिला.

धरण क्षेत्रात कृत्रिम पाऊस

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय राज्य सरकारने पूर्वीच घेतला आहे. त्याची तयारी केली आहे. मात्र जोपर्यंत कृत्रिम पावसाला आवश्यक ढग येत नाहीत तोपर्यंत पाऊस पाडता येत नाही. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी पाऊस नाही. मराठवाडय़ातही प्रमाण कमी आहे. धरण क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.