आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील भ्रष्ट आघाडी सरकार गायब करण्याची जादू विरोधी पक्ष करून दाखवेल, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी ‘मॅजिक फेस्ट २०१३’च्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. जादू ही लोकरंजनाची वेगळी कला आहे. आम्ही राजकारणीही जादूगारच आहोत. दर पाच वर्षांनी आश्वासने देऊन लोकांकडून मते मिळविण्याची जादू करत असतो. दुर्देवाने राज्यातील काँग्रेस-राष्ट्रावादी आघाडी सरकार भ्रष्टाचाराच्या ‘काळ्या जादू’ करून सत्तेवर टिकून आहे. ७० हजार कोटी खर्चून अवघी एक टक्का जमीन सिंचनाखाली आणण्याची जादू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करून दाखवली. कोटय़वधी रुपये खर्चून कागदोपत्री विहिरी व शेततळी बांधण्याची जादू या सरकारने करून दाखवली असून आगामी विधानसभा निवडणुकीत लोकांच्या सहाय्याने हे भ्रष्ट सरकार गायब करण्याची जादू आम्ही करून दाखवू असे विनोद तावडे यांनी सांगितले.
माटुंगा येथील यशवंत नाटय़गृहात देशभरातील सुमारे पाचशे जादुगारांची तीन दिवसांची राष्ट्रीय परिषद भरली होती. मलेशिया, इजिप्त, सिंगापूर आदी देशांतील जादूगार या परिषदेला उपस्थित होते.
महाराष्ट्रातील मॅजिक अकादमीचे प्रमुख भूपेश दवे यांनी आयोजित के लेल्या परिषदेत बोलताना मुंबईबाहेर ‘जादूगार भवना’साठी जागा मिळवून देण्यासाठी तसेच ‘जादू’या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन विनोद तावडे यांनी दिले.
यावेळी विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर यांनी जादूगारांकडूनच आपण अभिनयकला शिकल्याचे स्पष्ट केले तर आगामी काळात भारतीय जादूगार आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पारितोषिक मिळवतील असा विश्वास जादूगार भूपेश दवे यांनी व्यक्त केला.