मुंबई

गायन ही सादरीकरणाची कला आहे. गायन सादर करताना समोर रसिक श्रोते असतील तर गायकाचे गाणे अधिक खुलते. मग तो प्रथितयश गायक असो किंवा नवोदित गायक असो. प्रथितयश गायकांच्या मैफली किंवा कार्यक्रम रसिकांपुढे सादर होत असतातच. पण नवोदित गायकांना असे व्यासपीठ क्वचितच मिळते. रचना संसद स्कूल ऑफ म्युझिकच्या ‘स्पंदन २०१६’ या व्यासपीठावर नवोदित गायकांना मान्यवर गायकांसमोर आपले गाणे सादर करण्याची संधी मिळणार आहे. यंदाच्या वर्षी ३०० गायकांमधून १०० गायकांची निवड करण्यात आली आहे. आशा भोसले व सुधीर फडके आणि आशा भोसले व किशोरकुमार यांनी गायलेली प्रेम गाणी ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना आहे. पं़  यशवंत देव, उत्तरा केळकर, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, नीलेश मोहरीर, मंगेश बोरगावकर हे मान्यवर नवोदित गायकांची गाणी ऐकण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

  • कधी- शनिवार १६ व रविवार १७ जुलै २०१६.
  • कुठे- रचना संसद, प्रभादेवी, दादर (पश्चिम).
  • केव्हा- दुपारी चार वाजता.

 

रसवर्षां- काव्यसोहळा

वर्षां ऋतूचा आनंद पावसाळी सहलीच्या माध्यमातून किंवा स्वर वर्षांवात चिंब भिजविणाऱ्या कवितांमधून घेता येतो. त्यामुळे पावसाळा सुरू झाला की पावसाळ्यात भिजण्याच्या निमित्ताने वर्षां सहलीचे आयोजन केले जाते. या पावसाळ्याच्या निमित्ताने बाहेर जोरदार पावसाची आणि सभागृहात कवितांची बरसात असा आगळा योग नॅशनल लायब्ररी, वांद्रे यांनी जुळवून आणला आहे. ग्रंथालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘रसवर्षां-काव्यसोहळा’ कार्यक्रमात प्रसाद कुलकर्णी, संगीता अरबुने, अनुराधा नेरुरकर, सतीश सोळांकुरकर आदी कवी सहभागी होणार आहेत. कवयित्री सुनंदा भोसेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास रसिकांना मुक्त प्रवेश आहे.

कधी- रविवार, १७ जुलै २०१६.

कुठे- नॅशनल लायब्ररी, दुसरा मजला, स्वामी विवेकानंद मार्ग, वांद्रे (पश्चिम).

केव्हा- सायंकाळी पाच वाजता.

 

मेघदूत- एक रसास्वाद

महाकवी कालिदास यांनी रचलेले ‘मेघदूत’ हे महाकाव्य साहित्यप्रेमी आणि रसिकांसाठी अनमोल असा ठेवा आहे. मेघदूताची भुरळ कोणाला पडली नाही, असा रसिक विरळाच. महाकवी कालिदास यांची अद्भुत आणि विलक्षण प्रतिभा यात दिसून येते. आषाढ महिन्याचा पहिला दिवस ‘कालिदास दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ म्हटले की महाकवी कालिदास यांची आठवण होते. सुलोना संस्कृत स्थानम यांच्यातर्फे कालिदास यांच्या ‘मेघदूत’ या महाकाव्यावर आधारित ‘मेघदूत- एक रसास्वाद’ या कार्यक्रमातून रसिकांना गायन, नृत्य आणि मराठी रसग्रहणाचा त्रिवेणी आनंद घेता येणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती अदिती जमखंडीकर यांची आहे. कार्यक्रमात पुरिया जमखंडीकर-ओंकार या संस्कृत श्लोकांचे गायन करणार असून धनश्री लेले या मराठी रसग्रहण करणार आहेत. तर प्रा. नीलिमा कढे या नृत्याविष्कार सादर करणार आहेत.

  • कधी- रविवार, १७ जुलै २०१६.
  • कुठे- दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र, माटुंगा-पश्चिम रेल्वे (पश्चिम).
  • केव्हा- सकाळी अकरा वाजता.

 

उदयस्वर

शास्त्रीय संगीतातील विविध राग आणि ते राग गाण्याच्या वेळा (प्रहर) ठरलेल्या असतात. त्या त्या प्रहरातच हे राग गायले गेले तर त्याचा परिणाम चांगला होतो. विविध शारीरिक आणि मानसिक आजारांवर आता भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध रागांचा उपयोग संगीतोपचार म्हणून केला जात आहे. पंचम निषाद आणि पृथ्वी थिएटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने रसिक श्रोते व संगीतप्रेमींसाठी ‘उदयस्वर’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. सुश्मिता दास या मैफलीत सकाळी गायले जाणारे राग सादर करणार आहेत. त्यांना दिलशाद खान (सारंगी) व यती भागवत (तबला) हे संगीतसाथ करणार आहेत.

  • कधी- रविवार, १७ जुलै २०१६.
  • कुठे- पृथ्वी थिएटर्स, जुहू.
  • केव्हा- सकाळी साडेसात वाजता.

 

मराठी चित्रपट आणि भावसंगीताचा इतिहास संगीतकार सुधीर फडके यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. अनेक अवीट गोडीची गाणी सुधीर ऊर्फ बाबुजी यांनी रसिकांना दिली. ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके यांचे ‘गीतरामायण’ हा मराठी संगीत व सांस्कृतिक क्षेत्रातील अनमोल ठेवा आहे. सोहम प्रतिष्ठानने सुधीर फडके यांनी गायलेल्या गाण्यांच्या स्मरणरंजनाचा स्वरयोग रसिकांसाठी जुळवून आणला आहे. ‘बाबुजी महोत्सव’ या कार्यक्रमात श्रीरंग भावे, अर्चना गोरे, माधुरी करमरकर, मंदार आपटे हे कलाकार सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली गाणी सादर करणार आहेत. आनंद सहस्रबुद्धे व प्रशांत लळित यांचे संगीतसंयोजन असून समीरा गुजर-जोशी यांचे सूत्रसंचालन आहे.

  • कधी- शनिवार, १६ जुलै २०१६.
  • कुठे- शिवाजी मंदिर, दादर (पश्चिम).
  • केव्हा- रात्री साडेआठ वाजता.

 

माणसातला देव विठ्ठल-विठ्ठलाचा सांगीतिक जीवन प्रवास

शाहीर आणि लोककलावंत विठ्ठल उमप यांनी मराठी लोककला क्षेत्रात स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटविला आणि स्थान प्राप्त केले. ‘जांभुळ आख्यान’ व ‘खंडोबाचं लगीन’ हे त्यांचे कार्यक्रम खूप लोकप्रिय ठरले. पोवाडा, भारुड, भजन, गण-गवळण, पोतराज, गोंधळी असे विविध लोककलाप्रकार सादर केले. विठ्ठल उमप यांच्या ८५व्या जयंतीच्या निमित्ताने विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत व नंदेश उमप निर्मित ‘माणसातला देव विठ्ठल- विठ्ठलाचा सांगीतिक प्रवास’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन विश्वास नाटेकर यांचे असून कार्यक्रमात जयवंत वाडकर, संतोष पवार, अतुल तोडणकर, जयंवत भालेकर, अभिजित कोसंबी हे कलाकार सहभागी होणार आहेत.

  • कधी- शुक्रवार, १५ जुलै २०१६.
  • कुठे- यशवंत नाटय़ मंदिर, माटुंगा, दादर (पश्चिम).
  • केव्हा- सायंकाळी सात वाजता.

 

रेनड्रॉप्स फेस्टिव्हल-शास्त्रीय नृत्य महोत्सव

सामदेव सोसायटी फॉर परफॉर्मिग आर्ट्स आणि उमा डोग्रा यांच्या संयुक्त विद्यमाने २६वा ‘रेनड्रॉप्स फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात भारतीय शास्त्रीय नृत्याचे विविध प्रकार सादर केले जाणार आहेत. दोन दिवसांच्या या महोत्सवात वृंदा चड्डा (ओडिसी), दिव्या रवी (भरतनाटय़म), भक्ती देशपांडे (कथ्थक), गुरुराजू (कुचिपुडी), स्वाती सिन्हा (कथ्थक), आनंद सच्चिदानंदन (भरतनाटय़म) हे कलाकार सहभागी होणार आहेत. महोत्सवात रसिकांना विविध शास्त्रीय नृत्यशैलीची झलक पाहायला मिळणार आहे.

  • कधी- शनिवार १६ व रविवार, १७ जुलै २०१६.
  • कुठे- पु. ल. देशपांडे कला अकादमी, लघु नाटय़गृह, रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी, दादर
  • केव्हा- शनिवारी दुपारी ४.३० आणि रविवारी सकाळी पावणेबारा वाजता.

shekhar.joshi@expressindia.com