29 May 2020

News Flash

वीकेण्ड विरंगुळा : आग्रा घराण्याच्या रचनांचे सादरीकरण

शास्त्रीय संगीतातील एक मातबर घराणे म्हणून आग्रा घराण्याची ओळख आहे.

मुंबई

शास्त्रीय संगीतातील विविध घराणी, त्या त्या घराण्यांची गायकी आणि गायक यांनी शास्त्रीय संगीतात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. प्रत्येक घराण्याची गायन शैली ही वेगवेगळी. शास्त्रीय संगीतातील एक मातबर घराणे म्हणून आग्रा घराण्याची ओळख आहे. नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट अर्थात ‘एनसीपीए’ने आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात शास्त्रीय संगीताची आवड असणारे श्रोते, विद्यार्थी आणि अभ्यासकांना आग्रा घराण्यातील रचनांचे सादरीकरण आणि त्याविषयीची माहिती ऐकायला मिळणार आहे. आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांच्या कन्या व आग्रा घराण्याच्या गायिका, शिक्षिका आदिती कैकिणी-उपाध्याय या रचनांचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. आग्रा घराण्याचे गायक विलायत हुसेन खान, फय्याज खान, दिनकर कैकिणी, एस. एन. रातंजणकर यांच्या रचनांचा त्यात समावेश आहे.

 • कुठे- एनसीपीए, लिटिल थिएटर, नरिमन पॉइंट
 • कधी-शुक्रवार, २२ जुलै २०१६
 • केव्हा-सायंकाळी साडेसहा वाजता

 

सेवाग्राम ते निर्माण

गडचिरोली येथे आदिवासी भागात वैद्यकीय सेवेचा आदर्श डॉ. अभय बंग आणि त्यांची पत्नी डॉ. राणी बंग यांनी उभा केला आहे. ‘सर्च’ या संस्थेच्या माध्यमातूनही या दोघांनी बालमृत्यू रोखण्यासंदर्भातही महत्त्वपूर्ण काम केले आहे. डॉ. अभय बंग यांनी आरोग्यक्षेत्रातील कामाबरोबरच ‘निर्माण’ हा युवा शिक्षणाचा प्रयोग प्रत्यक्षात आणला आहे. ऑब्झव्‍‌र्हर रिसर्च फाऊंडेशनने आयोजित केलेल्या ‘सेवाग्राम ते निर्माण-शोध शिक्षणाचा आणि स्वत:चाही’ या कार्यक्रमात स्वत: डॉ. अभय बंग या विषयावर बोलणार आहेत. याच कार्यक्रमात प्रल्हाद काठोले लिखित ‘गोष्ट गुरुजी घडण्याची’ या पुस्तकाचे प्रकाशनही डॉ. बंग यांच्या हस्ते होणार आहे.

 • कुठे-रुईया महाविद्यालय सभागृह, नप्पू मार्ग, माटुंगा (पश्चिम)
 • कधी-शनिवार, २३ जुलै २०१६
 • केव्हा- सकाळी ११ वाजता

 

‘ए ट्रिब्युट टू शफाअत अहमद खान’

उस्ताद शफाअत अहमद खान यांनी तबला वादनाच्या क्षेत्रात आपल्या नावाचा स्वतंत्र ठसा उमटविला. ‘पंचम निषाद’ संस्थेतर्फे आयोजित ‘ए ट्रिब्युट टू शफाअत अहमद खान’ कार्यक्रमात संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पंचम निषाद’तर्फे २०११ या वर्षांपासून आयोजित या कार्यक्रमात आत्तापर्यंत योगेश सम्सी, निलाद्री कुमार, उस्ताद रशिद खान, उस्ताद झाकिर हुसेन, पं. कुमार बोस, तालयोगी पं. सुरेश तळवलकर आदी मान्यवर कलाकार सहभागी झाले आहेत. या वेळी होणाऱ्या मैफलीत रोमन खान (तबला वादन), अयान अली बंगश (सरोद) आणि पं. अजय पोहनकर (शास्त्रीय गायन) हे सहभागी होणार आहेत. त्यांना मुकुंदराज देव (तबला), मंदार वरणकर (संवादिनी), सत्यजित तळवलकर (तबला), सुधीर नायक (संवादिनी) हे संगीतसाथ करणार आहेत. कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.

 • कुठे- स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम)
 • कधी-रविवार, २४ जुलै २०१६
 • केव्हा-सायंकाळी सात वाजता

 

पं. शिवकुमार शर्मा यांचे संतुर वादन

पं. शिवकुमार शर्मा यांनी संतुर वादनाच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटविली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे संतुर वादनाचे कार्यक्रम झाले आहेत. ‘सुरश्री’ आणि ‘पर्पल इव्हेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ संतुरवादक पं. शिवकुमार शर्मा यांच्या संतुर वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. योगेश सम्सी हे पं. शर्मा यांना तबल्यावर संगीतसाथ करणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पं. शिवकुमार शर्मा यांचे संतुर वादन ऐकण्याची संधी रसिक श्रोत्यांना मिळणार आहे.

 • कुठे- दीनानाथ नाटय़गृह, विलेपार्ले (पूर्व)
 • कधी- रविवार, २४ जुलै २०१६
 • केव्हा-रात्री साडेआठ वाजता

 

खगोलशास्त्रात आधुनिक भारताची भरारी

अमेरिकेतील ‘हवाई’ या ठिकाणी ‘थर्टी मीटर्स टेलिस्कोप’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जात असून भारताचा या प्रकल्प उभारणीत महत्त्वपूर्ण सहभाग आहे. खगोलअभ्यासक आणि खगोलशास्त्रज्ञ यांच्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असून खगोलशास्त्रातील संशोधनासाठी तो अत्यंत मोलाचा ठरणार आहे. प्राचीन काळात भारताने खगोलशास्त्रात मोठी प्रगती आणि संशोधन केले होते. खगोलशास्त्रावरील प्राचीन संस्कृत ग्रंथही लिहिले गेले होते. आधुनिक काळात खगोलशास्त्रात भारताने केलेली प्रगती, संशोधन या विषयावरील एका व्याख्यानाचे आयोजन नेहरू सेंटरने केले आहे. ‘आयुका’ (पुणे) येथील डॉ. वरुण भालेराव या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

 • कुठे- स्काय थिएटर, नेहरु प्लॅनेटोरियम, वरळी
 • कधी-शनिवार, २३ फेब्रुवारी २०१६
 • केव्हा- सायंकाळी सहा वाजता

 

कट्टय़ावरचा ‘पाऊस’

युवक आणि पाऊस यांचे एक वेगळेच नाते आहे. युवकांमधील सळसळता उत्साह आणि ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह कोसळणारा पाऊस हे या दोघांमधील साम्य असावे. पाऊस सुरू झाला की युवकांना पावसाळी ट्रेकचे वेध लागतात. पावसाळी भटकंतीचे, खादाडी कट्टय़ावर जायचे कार्यक्रम आखले जातात. अशा या पावसाळी वातावरणात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्ती कॉलेजकट्टा विभागातर्फे ‘कट्टय़ावरचा पाऊस’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पाऊस’ या संकल्पनेवर आधारित स्वरचित किंवा आपल्याला आवडलेल्या कविता, ललित लेख, लघुकथा या कार्यक्रमात सादर केल्या जाणार आहेत. कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.

 • कुठे- रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय, रेल्वे स्थानकासमोर, घाटकोपर (प.)
 • कधी-रविवार, २४ जुलै २०१६
 • केव्हा- दुपारी चार वाजता

shekhar.joshi@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2016 2:06 am

Web Title: upcoming event in mumbai 4
Next Stories
1 मेळघाटात कुपोषणाच्या समस्येस समन्वयाचा अभावही कारणीभूत
2 कुजबुज.. ; मुख्यमंत्र्यांच्या चिठ्ठीत काय दडले?
3 ‘सडके पौरुष’.. ‘ब्लॉग बेंचर्स’चा नवा विषय
Just Now!
X