मुंबई

शास्त्रीय संगीतावर आधारित गाणे असो की गझल, कव्वाली असो प्रत्येक गाणे ज्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने जिवंत केले आणि श्रोते आजही ज्यांचा आवाज विसरलेले नाहीत ते पाश्र्वगायक म्हणजे मोहम्मद रफी. हिंदीसह रफी यांनी अन्य प्रादेशिक भाषांमध्येही गाणी गायली. मराठीतही त्यांनी गायलेली ‘हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा’, ‘कुठे शोधिसी रामेश्वर’, ‘अगं पोरी सांभाल दर्याला तुफान आयलय भारी’ हे पुष्पा पागधरे यांच्याबरोबरचे द्वंद्वगीत आदी गाणी लोकप्रिय आहेत.

एखादा अभिनेता पडद्यावर जे गाणे सादर करत असेल  आणि रफी यांनी गायलेले असेल तर जणू काही तो अभिनेताच गातो आहे, इतके त्या अभिनेत्याच्या आवाजात रफी गात असत. ‘लोकसत्ता’ प्रस्तुत आणि ‘जीवनगाणी’ निर्मित ‘फिर रफी’ या कार्यक्रमातून पुन्हा एकदा रफीच्या गाण्यांना उजाळा दिला जाणार आहे. श्रीकांत नारायण व सरिता राजेश हे गायक रफी यांची गाणी सादर करणार आहेत. देवा बंगेरा यांचे संगीत संयोजन असून निवेदन संदीप कोकीळ यांचे आहे. कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन प्रसाद महाडकर यांचे आहे.

  • कधी- २९ व ३० जुलै २०१६
  • कुठे- प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह, बोरिवली व दीनानाथ मंगेशकर नाटय़गृह, विलेपार्ले.
  • केव्हा- दोन्ही ठिकाणची वेळ रात्री साडेआठ वाजता

 

सौ बार जनम लेंगे

या कार्यक्रमात विपीन सचदेव, संपदा गोस्वामी, वीणा

दीक्षित, प्रगती तुर्लेकर हे गायक रफी यांची गाणी सादर करणार आहेत.

  • कधी- शनिवार, ३० जुलै २०१६.
  • कुठे- रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी, दादर (पश्चिम).
  • केव्हा-रात्री साडेआठ वाजता.

 

जनम जनम का साथ है

रफी फाऊंडेशन ट्रस्टतर्फे मोहम्मद रफी यांच्या ३६व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ‘जनम जनम का साथ है’ या कार्यक्रमात आशीष श्रीवास्तव, नीलेश निरगुडकर, अजित मौर्ये, वीणा सैगल, गौरी श्रीवास्तव, एच. के. शाह हे गायक रफी यांची गाणी सादर करणार आहेत.

  • कधी- शनिवार, ३० जुलै २०१६.
  • कुठे- म्हैसूर ऑडिटोरियम, कॅफे मद्रासजवळ, माटुंगा (पूर्व), मध्य रेल्वे.
  • केव्हा- सायंकाळी सात वाजता.

 

संतुरच्या सुरांतून भीमसेनजींना आदरांजली

पं. शिवकुमार शर्मा यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संतुर या वाद्याला मोठी प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवून दिला आहे. संतुरवादनाच्या त्यांच्या एकल कार्यक्रमालाही संगीतप्रेमी श्रोत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो. मुंबईकरांना पं. शर्मा यांचे संतुरवादन ऐकण्याची संधी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक आणि ‘अभंगवाणी’ लोकप्रिय करून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारे दिवंगत गायक पं. भीमसेन जोशी यांना आदरांजली म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटाच्या निमित्ताने तरुण पिढीमध्ये शास्त्रीय व नाटय़ संगीताची आवड निर्माण करणारे राहुल देशपांडे यांचेही शास्त्रीय गायन होणार आहे. या दोघांबरोबरच पं. भीमसेन जोशी यांचा नातू मास्टर विराज जोशी हाही सहभागी होणार असून त्याचे शास्त्रीय गायन होईल.

  • कधी- शनिवार, ३० जुलै २०१६.
  • कुठे- नेहरू सेंटर सभागृह, वरळी.
  • केव्हा- सायंकाळी सहा वाजता.

 

उमंग म्युझिक

नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट अर्थात ‘एनसीपीए’तर्फे ‘उमंग म्युझिक’ या उपक्रमांतर्गत सुखद मुंडे (पखवाज वादन) व भूषण कोष्टी (सूरबहार) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी रसिक श्रोत्यांना विनामूल्य प्रवेश आहे.

  • कधी- शुक्रवार, २९ जुलै २०१६.
  • कुठे- लिटिल थिएटर, एनसीपीए, नरिमन पॉइंट.
  • केव्हा- सकाळी साडेसहा वाजता.

 

दिल ने फिर याद किया

हिंदी चित्रपटांच्या लोकप्रियतेत चित्रपटातील गाण्यांचेही महत्त्वाचे योगदान असते हे विसरून चालणार नाही. चित्रपट संगीत हा श्रोत्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे. सुखाच्या किंवा दु:खाच्या प्रसंगी ही गाणी प्रत्येक माणसाला साथ देत असतात. हिंदी चित्रपटातील गाण्यांना संगीतकारांसह ती गाणी गायलेल्या गायकांनीही एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. हिंदी चित्रपटातील गाण्यांवर ज्यांनी आपली स्वत:ची स्वतंत्र नाममुद्रा उमटविली त्यात मोहम्मद रफी आणि किशोरकुमार यांचे महत्त्वाचे स्थान आहे.

हिंदी चित्रपटासाठी या दोघांनी आजवर शेकडो गाणी गायली आणि ती लोकप्रियही झाली. रफी आणि किशोरच्या चाहत्यांना तर त्यांची कित्येक गाणी आजही तोंडपाठ आहेत. रफी व किशोर यांनी गायलेल्या गाण्यांच्या स्मरणरंजनाची संधी संगीतप्रेमी श्रोत्यांना उपलब्ध झाली आहे. भूषण जोशी प्रस्तुत ‘दिल ने फिर याद किया’ या कार्यक्रमात या दोघा दिग्गज गायकांनी गायलेली गाणी आलोक काटदरे, सौम्या शर्मा, सुनील मेनन, सेजल, भूषण जोशी हे गायक सादर करणार आहेत. संगीत संयोजन संजय मराठे यांचे असून निवेदन विनायक शिंदे यांचे आहे.

कधी- शनिवार आणि रविवार ३० व ३१ जुलै २०१६.

कुठे- प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह, बोरिवली व दीनानाथ नाटय़गृह, विलेपार्ले. 

केव्हा- दोन्ही ठिकाणची वेळ रात्री साडेआठ वाजता.

shekhar.joshi@expressindia.com