रुळ आणि चाकातील बिघाडाची माहिती नियंत्रण कक्षाला तत्काळ कळणार

चाक आणि रुळांमधील बिघाड शोधून काढतानाच त्याची तात्काळ नियंत्रण कक्षाला माहिती देणारी ऑनलाइन मॉनिटरिंग रोलिंग स्टॉक (ओएमआरएस) यंत्रणा रेल्वे मंत्रालयाकडून लावण्यात येत आहे. यामुळे एक्स्प्रेस गाडय़ांच्या चाकातील तसेच रुळांमधील बिघाडामुळे होणारे रेल्वे अपघात टाळण्यास मदत मिळेल. पानिपत येथे यशस्वी चाचणी घेण्यात आल्यानंतर आता येत्या काही महिन्यांत महाराष्ट्रातदेखील ही यंत्रणा येईल.

लांब पल्ल्याच्या मार्गावर मोठय़ा प्रमाणात अपघात होतात. यात  चाक तुटण्यासारख्या समस्यांसोबतच रुळामध्ये तांत्रिक समस्या झाल्यामुळे अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी ओएमआरएस यंत्रणा रुळांना बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाकडून पानिपत येथे याची यशस्वी चाचणी घेण्यात आल्यानंतर आता देशभरातील अन्य विभागांतील संवेदनशील ठिकाणीही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. देशभरासाठी ६५ ओएमआरएस यंत्रणा घेण्यात येतील, अशी माहिती उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नितीन चौधरी यांनी दिली.

३५ तांत्रिक दोषांचा शोध

सुरुवातीला २५ यंत्रणा घेण्यात येणार असून त्यानंतर इतरांसाठी निविदा काढण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. या यंत्रणेमुळे सुमारे ३५ तांत्रिक दोष शोधून काढता येतील. यात रुळ तुटणे, चाक तुटणे यांसारख्या महत्त्वाच्या बिघाडांचा समावेश असेल. महाराष्ट्रातील मुंबई ते सूरत, मुंबई ते रोहा,भुसावळ,जळगाव, वर्धा, नागपूर रेल्वे विभागातही लवकरच यंत्रणा बसविली जाईल. ३५ ओएमआरएस यंत्रणेची किंमत ११३ कोटी रुपये आहे आणि दीड वर्षांत त्या बसवण्यात येणार आहेत.