मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रस्ते सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन

मुंबईत सुलभ वाहतुकीबरोबरच त्याचे योग्य नियोजन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टीमचा वापर मुंबईत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर या यंत्रणेचा राज्यभर विस्तारही केला जाणार असल्याचे ते म्हणाले. परिवहन विभाग, मुंबई वाहतूक पोलीस यांच्यावतीने रस्ता सुरक्षा पंधरवडय़ाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिवहनमंत्री दिवाकर रावतेही उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या तीन वर्षांंत राज्यातील रस्ते अपघाताच्या प्रमाणात घट झाल्याचे सांगितले. मात्र अपघात कमी करण्यासाठी आणखी वाव आहे. सीसीटीव्ही नेटवर्क, ई-चालान या उपक्रमामुळे बेशिस्त वाहतुकीवर कारवाई करणे सोपे झाले. त्यासाठीच आर्टिफिशियल इंटलिजन्सच्या माध्यमातून लोकांच्या सवयी, घडणारे गुन्हे, वाहतूक यांचा अभ्यास करून त्याचे विश्लेषण करून व्यवस्था उभी करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीममुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा अभ्यास करण्यात येईल आणि त्याप्रमाणे वाहतुकीचे नियोजन होणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी टाळणे, अपघात टाळणे शक्य होईल. ही यंत्रणा लवकरच संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.

यावेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी वाहने रस्त्यावर येण्यापूर्वीच ती तांत्रिकदृष्टय़ा सक्षम असावीत यासाठी वाहन तपासणी करणारी स्वयंचलित यंत्रणा परिवहन विभागाच्या वतीने उभारण्यात येत आहे. सध्या राज्यात वाढती वाहन संख्या हीदेखील चिंतेची बाब झाली आहे. वाढत्या वाहन संख्येमुळे वाहनतळाचीही समस्या निर्माण झाल्याचेही रावते म्हणाले.

शहरी भागात अपघाताचे प्रमाण ४० टक्के तर ग्रामीण भागांत हेच प्रमाण ६० टक्के आहे. अपघाती मृत्यूचे प्रमाण तर ग्रामीण भागांत ७१ टक्के असून शहरी भागांत २९ टक्के असल्याचे सांगण्यात आले.

गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, परिवहन आयुक्त शेखर चन्न्ो, पोलीस सहआयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार, परिवहन आयुक्त शेखर चन्ने यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते.

शून्य अपघातासाठी..

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर शून्य अपघातासाठी स्मार्ट इंटलिजन्स असलेली यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. तसेच पुणे-मुंबई महामार्गावरसुद्धा अशी यंत्रणा उभारण्यात येईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.