करारपत्रात ठरलेल्या घरांच्या क्षेत्रफळापेक्षा कमी जागा देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर आणि वास्तुविशारदाविरोधात पुढे येण्यास धजावणारे कळव्यातील ‘अप्पर क्रस्ट’ वसाहतीमधील इतर रहिवासीही एकवटू लागले असून पोलीस ठाण्यात तक्रारी देण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. ठाणे महापालिकेच्या शहरविकास विभागात दबदबा असणारा बिल्डर आणि वास्तुविशारदापुढे आपली डाळ शिजणार नाही, अशी भीती सुरुवातीला या वसाहतीमधील इतर रहिवाशांना वाटत होती. मात्र, काही मोजक्या रहिवाशांच्या पुढाकारामुळे बिल्डर, वास्तुविशारद आणि महापालिकेविरोधात गुन्हे दाखल होताच इतर रहिवासीही तक्रार घेऊन पुढे येऊ लागले आहेत. दरम्यान, ठाण्यातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांनीही या प्रकरणी आवाज उठविण्यास सुरुवात केली असून शिवसेनेच्या पाठोपाठ आम आदमी पक्षानेही या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला आहे.
कळव्यातील अप्पर क्रस्ट गृहसंकुलातील घरांच्या क्षेत्रफळ घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले वास्तुविशारद प्रवीण जाधव हे ठाण्यातील अनेक बांधकाम प्रकल्पांचे वास्तुविशारद आहेत. यापूर्वी ठाण्यातील काही वादग्रस्त संकुलांच्या उभारणीतही वास्तुविशारद म्हणून जाधव यांचा सहभाग असल्याची चर्चा असून शहरविकास विभागात तर त्यांची खास ऊठबस ठेवली जाते. अप्पर क्रस्ट गृहसंकुलातील रहिवाशांनी या जाधव आणि बिल्डर मंगला यांना आव्हान देत न्यायालयात धाव घेतल्याने कळवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सुरुवातीला जेमतेम चार रहिवाशांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांना आता या संकुलात राहणारे इतर रहिवासीही येऊ न भेटू लागले आहेत. बुधवारी दिवसभरात या गृहसंकुलातील सुरेश घाग, गणेश पाटील, हेमंत चौधरी, उषा रामनाथ, शालिनी सिंग, अनिल जैन, दिनेश जैन, गजानन कुडव या रहिवाशांनी पुढाकार घेत आपलेही घर करारपत्रापेक्षा कमी आकाराचे असल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, प्रवीण जाधव यांनी यापूर्वी केलेल्या इतर संकुलांच्या कामांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या रहिवाशांनी आयुक्त असीम गुप्ता यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
 दरम्यान, जागेच्या घोटाळाप्रकरणी नाडल्या गेलेल्या रहिवाशांनी महापालिकेकडे तक्रार करावी, अशा स्वरूपाचे आवाहन शिवसेनेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केले आहे. तसेच आम आदमी पक्षाच्या ठाणे विभागाने यासंबंधी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून जाधव यांच्या इतर कामांची विशेष चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे.