मिळेल त्या मुद्दयावर एकमेकांवर कुरघोडी करायची आणि श्रेयाचे मलई ओरपण्यासाठी कोणत्याही थराला जायचे, हा ठाण्यातील राजकीय नेत्यांचा शिरस्ता महापालिका कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या दिवाळी भेटीच्या मुद्दयावरुन सोमवारी कायम राहीला.
ठाणे महापालिका तसेच महापालिकेतील वेगवेगळ्या अस्थापनेवरील सुमारे १२ हजार कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीत १२ हजार २५० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महापौर आणि आयुक्तांच्या बैठकीत पक्का झाला, मात्र कर्मचारी संघटनेने वाढीव रकमेची मागणी करताच जय्यत तयारीनिशी या निर्णयाची घोषणा करण्यास निघालेल्या महापौरांना ऐनवेळस पत्रकार परिषद रद्द करावी लागली. दरम्यान, बैठकीत हजर असलेले विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी महापौरांच्या अनुपस्थितीत कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीची घोषणा करुन सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. महापालिका कर्मचारी मात्र मंगळवारी होणाऱ्या महापौरांच्या पत्रकार परिषदेकडे डोळे लावून बसले आहेत.
 महापालिकेच्या अस्थापनेवर सुमारे नऊ हजार कर्मचारी असून शिक्षण मंडळ तसेच परिवहन उपक्रम धरुन सुमारे १२ हजार ५०० कर्मचारी दिवाळी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत.
दरम्यान, सानुग्रह अनुदानाचा निर्णय पक्का झाला असून यासंबंधी घोषणा करण्याचे अधिकार महापौरांना आहेत, अशी माहिती आयुक्त गुप्ता यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.  
मुंबई महापालिकेत कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळत असल्याने त्यापेक्षा कमी रक्कम आम्ही का स्विकारु, असा पवित्रा कर्मचारी संघटनेने घेतल्याचे सांगितले जाते.