राष्ट्रीयस्तरावरील भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा व तत्सम सेवांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या तीन टप्प्यांमधील परीक्षेतील मुलाखतीचा अंतिम टप्पा २७ एप्रिल ते ३० जून या काळात नवी दिल्ली येथे पार पडला. या टप्प्यासाठी राज्यातील साधारणत: १५० उमेदवारांचा समावेश होता. या उमेदवारांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात एका विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रशिक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ५९ जणांनी अंतिम परीक्षेत यश मिळवले आहे.
या विद्यार्थ्यांना मुलाखतीचे विशेष प्रशिक्षण देण्यासाठी एका विशेष अभिरूप मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार १ मे ते २० जून या काळात दर शनिवार व रविवारी मिळून एकूण १५ सत्रांचे आयोजन केले गेले होते. त्यासाठी १२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली व अभिरूप मुलाखतीचा फायदा घेतला. या अभिरूप मुलाखत कार्यक्रमात संपूर्ण भारतातील २६ वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी भाग घेऊन विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या व त्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य आदींनीही मोलाचे मार्गदर्शन केले. या अभिरूप मुलाखत सत्रांबरोबरच मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. अशा स्वरूपाचा सतत दोन महिने चालणारा क्षमता विकास कार्यक्रम पहिल्यांदाच नवी दिल्ली येथे शासनातर्फे आयोजित केला गेला. या कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक म्हणून डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र अमरावती, तर सहायक समन्वयक म्हणून एस.आय.ए.सी. मुंबईचे ग्रंथपाल बी. एम. तराळ यांनी काम पाहिले.
राज्य प्रशिक्षण केंद्रातील २६ विद्यार्थ्यांचे यश
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रशासकी परीक्षांचे प्रशिक्षण देणारी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेतील २६ विद्यार्थ्यांनी यंदा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाले. या संस्थेत प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर मार्गदर्शन दिले जाते. यंदा राज्य शासनाने पुढाकार घेऊन राबविलेल्या अभिरूप मुलाखतींच्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना अधिक फायदा झाल्याचे केंद्राचे संचालक डॉ. मनोज भिडे यांनी स्पष्ट केले. तसेच काही माजी अधिकाऱ्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सहकार्य केल्यामुळे त्याचा फायदाही झाल्याचे ते म्हणाले.

राज्यातील यशस्वी उमेदवार

अभिजित शेवाळे – (क्रमांक ९०)
upsc01 अभिजित हे भारतीय महसूल सेवेत कार्यरत आहेत. २०१३ साली त्यांची या पदासाठी निवड झाली होती. दंतवैद्यक क्षेत्रातील शिक्षण (बीडीएस) पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. निपाणी येथील अभिजित यांचा हा तिसरा प्रयत्न होता.

महेश लोंढे –  (क्रमांक २५४)
upsc02सोलापूर जिल्ह्य़ातील बारलोणी गावचे महेश लोंढे भूमी अभिलेख खात्यात उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहे. २०१३ साली त्यांची या पदासाठी निवड झाली होती. त्याचप्रमाणे महिला व बालविकास खात्यात सहायक आयुक्त म्हणूनही त्यांची निवड झाली होती.

राहुल कर्डिले (क्रमांक ४२२)
upsc03अभियांत्रिकीची पदवी घेतलेले राहुल कर्डिले हे जिल्हा उपनिबंधक संस्था येथे कार्यरत आहेत. ‘यू.पी.एस.सी. चा  माझा ६ वा प्रयत्न असून मला यावेळी खात्री होती. माझे वडील शिक्षक असल्यामुळे मला आधीपासूनच अभ्यासाची गोडी होती.

अक्षय हाके (क्रमांक ५०८)
upsc04अक्षय हाके हे सध्या भारतीय व्यापार सेवेतकार्यरत आहेत. यापूर्वी त्यांची डिफेन्स अकाउंट या सेवेसाठी निवड झाला होती. मनमाड येथील अक्षय हे संगणक अभियंता आहेत. त्यांचे आई-वडील दोघेही मनमाड येथे वैद्यकीय व्यवसाय करतात.

राजेश मुंडे (क्रमांक ७३८)
upsc05वरचा क्रमांक मिळावा यासाठी पुढच्या परीक्षेची तयारीही सुरू केली असल्याचे नांदेड येथील राजेश मुंडे यांनी सांगितले. ‘कुठली ही शिकवणी न लावता मी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली याचा मला आनंद होत आहे. हा माझा पाचवा प्रयत्न होता.

सचिन घागरे (क्रमांक ८४०)
upsc06सचिन घागरे हे औरंगाबाद येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. २०१२ मध्ये त्यांनी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती. पुण्यातील एमआयटी महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकी शाखेतून पदवी घेतल्यानंतर परीक्षांची तयारी सुरू केली.

मला खूप आनंद झाला आहे, या निकालावर माझा विश्वासच बसत नाही, मी सहज परीक्षेची तयारी केली होती. मला आयएएस अधिकारी व्हायचे होते. अपंगांच्या फायद्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे.
-इरा सिंघल, दिल्ली (देशात प्रथम- विशेष मुलगी, मणक्याच्या स्कोलिओसिस आजाराने ग्रस्त)

मला खूप आनंद झाला आहे, गेले वर्षभर मी परीक्षेची तयारी केली होती.
-रेणू राज, कोट्टायम (द्वितीय क्रमांक)

हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, मी या परीक्षेसाठी भरपूर कष्ट केले होते. त्याचे चांगले फळ मिळाले.
-निधी गुप्ता, दिल्ली (तृतीय क्रमांक)

आपण या यशाबाबत खात्री करून घेण्यासाठी दोनदा दूरध्वनी केला, यादीत नाव असल्याचे कळल्याने सुखद आश्चर्य वाटले, हे कठोर परिश्रमाचे फळ आहे. देशासाठी काही तरी चांगले करण्याची संधी मिळेल म्हणून मला आयएएस व्हायचे होते.
-वंदना राव, दिल्ली (चौथा क्रमांक)

अभियांत्रिकी सेवेतील, विज्ञान शाखेची पाश्र्वभूमी असलेले विद्यार्थी अधिक दिसत आहेत. सीसॅट हे त्याचे एक कारण आहेच. त्याचबरोबर अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेऊन त्यानंतर लोकसेवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, अजूनही आयआयटीसारख्या संस्थांकडे वळणारा किंवा अभियांत्रिकी शाखेतही टॉप करणारा वर्ग राज्यात युपीएससीकडे वळताना दिसत नाही.
– विश्वनाथ पाटील, संचालक, पृथ्वी