लाखो रुपयांच्या चोरीनंतर पोलिसांना जाग
चोरी, दरोडा, लूटमार या प्रकरणांचा छडा लावून हे गैरकृत्य करणाऱ्यांना पकडून देणे हे पोलिसांचे काम. मात्र उरणच्या पोलीस ठाण्यातच लाखो रुपयांची चोरी झाल्याने सर्वसामान्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्यांना स्वत:च्या कार्यालयाचीच सुरक्षा नीटपणे करता येत नसल्याचे समोर आले आहे. चोरीच्या या घटनेमुळे उरण पोलीस ठाण्याचीच सुरक्षा ऐरणीवर आली आहे.
या प्रकरणानंतर पोलीस तसेच पोलिसांना सहकार्य करण्यासाठी बिनदिक्कत ये-जा करणारेही संशयाच्या घेऱ्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुद्देमाल कक्षात विविध गुन्ह्य़ांतील रोख रकमा, सोन्याचे दागिने, हत्यारे आदी महत्त्वपूर्ण ऐवज ठेवला गेला होता. मात्र या लाखो रुपयांच्या ऐवजाच्या सुरक्षेसाठी कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था नाही. या कक्षावर तकलादू सिमेंटचे पत्रे आहेत. या कक्षाच्या सुरक्षेसाठी गार्डची स्वतंत्र नेमणूक नाही. ब्रिटिश काळातील पद्धतीनुसार पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय एकाच इमारती आहेत. पोलीस ठाण्यातील लॉक अप, पोलीस शस्त्रागार व मुद्देमाल कक्ष या तिन्ही ठिकाणांवर नजर ठेवण्यासाठी एकच गार्ड असतो, मात्र उरण पोलीस स्टेशन याला अपवाद आहे. या ठाण्यातील लॉकअप व शस्त्रागार एका इमारतीत आहे, तर मुद्देमाल कक्ष पोलीस ठाण्याच्या प्रांगणानंतरच्या चाळीत आहे. पोलीस अधिकारी मात्र
सुरक्षा रक्षकाची नेमणूक का नाही, याबाबत कोणतेही ठोस कारण न देता अन्य
कारणे देऊन आपली जबाबदारी झटकू पाहत आहेत.