सागरी सेतू संपल्यावर थेट शिवडीकडे रस्ता जाणार

न्हावा-शेवा बंदरे आणि उरण यांना थेट दक्षिण मुंबईशी जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पाला आता वरळी-शिवडी जोडरस्त्याची जोड मिळणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला पश्चिम उपनगरांशी जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वरळी-शिवडी जोडरस्त्याचा प्रकल्प आखला आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार असून आता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मुंबईतील वाहतुकीचा चेहरामोहरा पालटण्यासाठी एमएमआरडीएने आपल्या अखत्यारीतील प्रदेशात रस्त्यांचे आणि मेट्रोचे जाळे विणण्याची योजना आखली आहे. त्यात शिवडीवरून थेट न्हावा-शेवा या बंदरांना आणि उरणला जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम डिसेंबपर्यंत सुरू होणार असून त्यानंतर उरण परिसरातील लोकांना मुंबईत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ फक्त अध्र्या तासावर येणार आहे. मुंबईत सध्या जागांची टंचाई असून मुंबईतील गर्दी मुंबई महानगर प्रदेशाकडे वळावी, यासाठीही हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा लाभ पश्चिम उपनगरांमधील लोकांनाही व्हावा, यासाठी एमएमआरडीएने वरळी-शिवडी जोडरस्ता बांधण्याची योजना आखली आहे. राजीव गांधी सागरी सेतू वरळीला संपतो तिथपासून हा जोडरस्ता सुरू होईल. हा रस्ता थेट ट्रान्स हार्बर लिंक जिथे सुरू होतो तिथे जोडला जाईल, असे एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त संजय खंदारे यांनी सांगितले. या प्रकल्पाचा आराखडा एमएमआरडीएकडे तयार असून त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार आहे. या रस्त्याचे कामही ट्रान्स हार्बर लिंकच्या कामाबरोबरच सुरू करता येईल का, याची चाचपणी एमएमआरडीए करीत आहे. ट्रान्स हार्बर लिंकचे काम वर्षअखेरीस सुरू होईल, असे खंदारे म्हणाले.