मुंबई : उर्दू भाषेच्या वाङ्मयीन प्रगती आणि समृद्धीसाठी नांदेड व मालेगावच्या धर्तीवर रत्नागिरीमध्ये उर्दु घर (भवन) उभारण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिले. त्याप्रमाणे नागपूर येथील संस्कृत विद्यापीठाचे एक उपकेंद्रही रत्नागिरीत उभारण्यात येणार आहे.

उर्दू घरांबाबत सामंत यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्रालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांच्यासह इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘रत्नागिरी जिल्ह्यात उर्दू घर बांधण्याच्या प्रकल्पाला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. यासाठी पुरेसा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. उर्दू भाषेची वाङ्मयीन प्रगती आणि समृद्धी व्हावी ही जनभावना लक्षात घेऊन जिल्ह्यात उर्दू घरे (भवन) उभारून या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. यासाठी जागाही उपलब्ध असून सर्व निकष पूर्ण होत आहेत. उर्दू घरे उभारण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करून अल्पसंख्याक विभागाकडे सादर करावा,’ असे सामंत यांनी सांगितले. उर्दू घरांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्याकरिता प्रत्येक घराकरिता स्वतंत्र सांस्कृतिक समिती स्थापन करण्यात येणार आहे.

नागपूरच्या ‘कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठा’अंतर्गत रत्नागिरीत उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. या कामाला गती देण्याचे आदेश सामंत यांनी दिले. या संदर्भातील बैठकीत विद्यापीठाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडीही उपस्थित होते. उपकेंद्र स्वयंपूर्ण होण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाशी समन्वय साधून बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडीज) हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार आहे. यामुळे रत्नागिरी परिसरात पर्यटन क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना लाभ होईल, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त के ली.