कृपाशंकर सिंह, उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसला रामराम

हर्षवर्धन पाटील, गणेश नाईक यांचा आज भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये गळती आणि भाजपमध्ये भरतीची धामधूम सुरू असून, नवनवे मासे भाजपच्या गळाला अजूनही लागत आहेत.

काँग्रेसचा उत्तर भारतीय चेहरा कृपाशंकर सिंह यांनी पक्षाचा राजीनामा देत भाजप प्रवेशाचे संकेत दिले. माजी मंत्री गणेश नाईक आणि हर्षवर्धन पाटील हे बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील हेदेखील भाजपच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. चित्रपट अभिनेत्री आणि लोकसभा निवडणूक लढलेल्या उर्मिला मातोंडकर यांनीही काँग्रेसला रामराम ठोकला आहे.

विधानसभा निवडणुकीची घोषणा येत्या दोन-चार दिवसांत कधीही होऊ शकते. मात्र त्याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांची भाजप आणि शिवसेना प्रवेशाची लगबग सुरू आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीमध्ये मोठय़ा प्रमाणावर फूट पडली होती. आता काँग्रेसलाही फुटीचे ग्रहण लागले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमधून फुटणाऱ्या नेत्यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आला आहे.

गणेश नाईक, हर्षवर्धन पाटील, कृपाशंकर सिंह आदींचा बुधवारी भाजप प्रवेश होणार आहे. नाईक यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खास नवी मुंबईत जाणार आहेत. अन्य नेत्यांचे प्रवेश मुंबईत झाले असले तरी गणेश नाईक यांचा अपवाद करण्यात आला आहे.

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. बहुधा ते शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.

मुंबईतील काँग्रेस उमेदवारांची नावे निश्चित करण्याकरिता पक्षाच्या छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतील बैठकीला कृपाशंकर सिंह हे उपस्थित होते. या वेळी कालिना मतदारसंघातून मुलाला उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी केली. पण सद्य:स्थितीत स्वत: कृपाशंकर यांनीच निवडणूक लढवावी, अशी गळ पक्षाच्या नेत्यांनी घातली. यावर घटनेतील ३७० कलमानुसार जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला विरोध करण्याची पक्षाची भूमिका चुकीची होती. या विरोधामुळेच मुंबईत काँग्रेसचे पार पानिपत होईल, असा इशारा सिंह यांनी दिला. त्यावर आपली भूमिका लेखी द्यावी, अशी सूचना पक्षाच्या नेत्यांनी केली. बैठकीतच सिंह यांनी पक्षाच्या धोरणांवर टीका केली आणि बाहेर येऊन पक्षाचा राजीनामा देत असल्याचे पत्र दिले.

पोरखेळाला कंटाळलो..

मुंबईत काँग्रेसचा सारा पोरखेळ सुरू आहे. लागोपाठ दोन निवडणुकांच्या तोंडावर अध्यक्ष बदलण्यात आले. अशा परिस्थितीत पक्षात राहण्यात काहीच अर्थ उरला नव्हता. पक्षात आपण पार वैतागलो होतो, असे कृपाशंकर सिंह यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

भाजपप्रवेश नाही

ज्यांच्याविरोधात लेखी तक्रारी केल्या त्यांना पक्षाने मानाचे स्थान दिल. मी पक्ष सोडला असला तरी विचारसरणी सोडलेली नाही. त्यामुळे भाजपमध्ये जाणार नाही. – उर्मिला मातोंडकर

उर्मिलाची खंत

लोकसभा निवडणुकीतील अनुभवातून मी पक्षनेतृत्वाला पत्र पाठविले होते. त्यात काही जणांच्या विरोधात नावे घेऊन तक्रार केली होती. त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून त्यांना मानाचे स्थान देण्यात आले, अशी खंत चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केली. अर्थात काँग्रेस सोडत असले तरी माझ्या विचारसरणीशी मी बांधिल राहणार असल्याचे स्पष्ट करीत त्यांनी भाजप प्रवेशाची शक्यता मात्र फेटाळली.

शब्द न पाळल्याचा राग

‘इंदापूर मतदारसंघ सोडण्याचा शब्द राष्ट्रवादीने पाळला नाही. यामुळेच आपण भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला.

वाशीत कार्यक्रम

गणेश नाईक यांच्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेची सत्ताही भाजपला आयती मिळणार आहे. यामुळेच नाईक यांच्या आग्रहाखातर त्यांच्या पक्षप्रवेशासाठी  मुख्यमंत्री वाशीत बुधवारी उपस्थित राहणार आहेत.