पारंपरिक ऊर्जास्रोतांमुळे येणाऱ्या समस्या, वाढणारे प्रदूषण यांचा सामना करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जास्रोतांची मदत घ्यावी. पर्यावरणाला धोका न पोहोचवता विकास साधण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर होणे गरजेचे आहे. एकीकडे मानवाची प्रगती होत असताना अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. पवन ऊर्जा, सौरऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जाचा उपयोग करून विकास साधावा, असे प्रतिपादन बार्कच्या अणुऊर्जा विभागाचे अध्यक्ष तथा अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. एस. बॅनर्जी यांनी केले.
भाभा अणुसंशोधन केंद्र, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एन. बी. मेहता विज्ञान महाविद्यालय यांच्या वतीने ‘इम्पॅक्ट ऑफ मॉडर्न सायन्स ऑन द लाइव्हज ऑफ पीपल्स’ या विषयावर बोर्डी येथे परिसंवाद झाला. त्याच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. बॅनर्जी बोलत होते. परिसंवादाच्या पहिल्या सत्रात डॉ. एस. के. आपटे, सहसंचालक, भाभा अणुसंशोधन केंद्र यांचे ‘एनर्जी अँड इकॉलॉजी’ यावर व्याख्यान झाले. त्यानंतरच्या सत्रात डॉ. जे. बी. जोशी यांनी ‘विकसित भारत : गरज विज्ञान तंत्रज्ञानाची’ आणि डॉ. भागवत यांनी ‘शेती आणि विकास’ यावर मार्गदर्शन केले. भोजनोत्तर सत्रामध्ये डॉ. चौकर यांचे ‘न्यूक्लिअर मेडिसिन’ या विषयावर, तर डॉ. बांदेकर यांचे ‘फूड अँड वॉटर सिक्युरिटी’ यावर व्याख्यान झाले. त्यानंतर तापकीर यांनी ‘न्यूक्लिअर एनर्जी अँड अस’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला.
शेवटच्या सत्रात उपस्थितांच्या शंकांचे निरसन तज्ज्ञांनी केले. शेतकऱ्यांच्या सहभागाची जबाबदारी मराठी विज्ञान परिषद, बोर्डी विभागाच्या ऊर्मिला करमरकर यांनी स्वीकारली. प्राचार्य डॉ. अंजली कुलकर्णी यांनी प्रास्ताविक, प्रा. प्रभाकर राऊत यांनी स्वागत तर डॉ. नूतन खलप यांनी  सूत्रसंचालन  केले. उपप्राचार्य डॉ. घोरूडे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी एन. बी. मेहता विज्ञान महाविद्यालयातील ५० विद्यार्थी, तर पी. जी. ज्युनिअर महाविद्यालय, बोर्डी, पी. एल. श्रॉफ महाविद्यालय, चिंचणी आणि ठक्करबाप्पा ज्युनिअर कॉलेज, तलासरी येथील प्रत्येकी १० निवडक विद्यार्थी, शिक्षक व बोर्डी परिसरातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.